Sangli: निवडणुकीच्या धामधुमीत उरूण-इस्लामपूर पालिकेची तिजोरी झाली मालामाल, 'इतक्या' कोटीचा जमा झाला कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:56 IST2025-11-26T17:55:58+5:302025-11-26T17:56:32+5:30
Local Body Election: कोणतीही नोटीस न बजावता कर भरणा झाला

Sangli: निवडणुकीच्या धामधुमीत उरूण-इस्लामपूर पालिकेची तिजोरी झाली मालामाल, 'इतक्या' कोटीचा जमा झाला कर
युनूस शेख
ईश्वरपूर : उरूण-इस्लामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या टप्प्यात जवळपास ३०० उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. हे अर्ज दाखल करण्यापूर्वी नगरपालिकेसह इतर शासकीय देणी भरणे बंधनकारक होते. त्यामुळे अवघ्या १५ दिवसांत कोणताही तगादा न लावता पालिकेच्या तिजोरीत १ कोटीची रक्कम जमा झाल्याने कर विभागात फिलगुडचे वातावरण आहे.
नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षपदासह १५ प्रभागांतील ३० जागांवर आपली उमेदवारी दाखल करण्याची तयारी अनेक हवशा-नवशांनी केली होती. त्यातील अनेक जण अर्ज भरण्याच्या टप्प्यातच उमेदवारीचे खूळ डोक्यातून काढून टाकत स्वत:च्या मनानेच रिंगणाबाहेर थांबले. तर ज्यांच्या अंगात उमेदवारीचे वारे भरले होते. त्यांनी आपले अर्ज दाखल केले.
नगराध्यक्षपदासाठी जवळपास १६ जणांनी तर प्रभागातील ३० जागांसाठी २७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या सर्वांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पालिकेसह इतर शासकीय देणी भरणे बंधनकारक असल्याने या सर्व उमेदवारांकडून अवघ्या १५ दिवसांत घरपट्टी विभागाकडे ६१ लाख ५३ हजार रुपयांचा कर भरणा झाला होता. तर पाणीपुरवठा विभागाकडील पाणीपट्टी पोटी २६ लाख ६३ हजार रुपयांची रक्कम जमा झाली.
ज्या उमेदवारांकडे पालिकेच्या अखत्यारीतील व्यापारी गाळे आहेत, त्या गाळ्याच्या कर आणि भाड्यापोटी ३ लाखांहून अधिकची रक्कम जमा झाली. या सर्व वसुलीमधून पालिकेच्या तिजोरीत तब्बल ९१ लाखांहून अधिकची रक्कम जमा झाल्याने कर विभागात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत पालिकेची चांदी
इतरवेळी शहरातील मालमत्ताधारकांकडे घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी तगादा लावावा लागतो. वेळप्रसंगी कटू कारवाई करण्याच्या नोटिसाही द्याव्या लागतात. या सर्वातून काहीवेळा तणावाचे प्रसंगही उद्भवतात. मात्र, आता निवडणुकीच्या धामधुमीत कोणतीही नोटीस न बजावता १ कोटीचा कर भरणा झाला आहे.