नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना घराच्या छतावर बसून करावा लागतोय ऑनलाईन अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 02:32 PM2022-01-22T14:32:34+5:302022-01-22T14:56:55+5:30

खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम गावे अद्यापही सुविधेपासून वंचित

Due to lack of network students have to sit on the roof of their house and study online | नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना घराच्या छतावर बसून करावा लागतोय ऑनलाईन अभ्यास

नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना घराच्या छतावर बसून करावा लागतोय ऑनलाईन अभ्यास

Next

दिलीप मोहिते

विटा : जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम म्हणून ओळख असलेली बाणूरगड, ताडाचीवाडी व कुसबावडे ही तीन गावे अद्यापही मोबाईलच्या इंटरनेट सुविधेपासून वंचित आहेत. मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने कोरोनामुळे बंद झालेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास सध्या घराच्या छतावर बसून सुरू आहे.

खानापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेली बाणूरगड, ताडाचीवाडी व कुसबावडे ही तीन गावे डोंगरी भागात आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या या गावांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. इंटरनेट व नेटवर्कची समस्या सतावत आहे. कोरोनाच्या काळात अतिगंभीर रुग्णांसाठी रुग्णवाहिका मागवायची असल्यास शुक्राचार्यपर्यंतचा दोन किलोमीटरचा प्रवास करून संपर्क साधावा लागत आहे.

सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु, या तिन्ही गावात विद्यार्थ्यांना पुरसे नेटवर्क व इंटरनेट सुविधा मिळत नसल्याने घराच्या छताचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक विद्यार्थी उंच असलेल्या, दुमजली इमारतीच्या छतावर बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.

पाच महिन्यांपूर्वी ‘लोकमत’ने या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी मोबाईल कंपन्यांशी पत्रव्यवहार करून बैठकीचे सूतोवाच दिले होते. पण, याबाबत बैठकही झाली नाही व मोबाईल कंपन्यांनी या तीन गावांना इंटरनेट नेटवर्क देण्याचाही प्रयत्न केला नाही.

विद्यार्थ्यांसह नागरिक व नोकरदारांचेही हाल होत आहेत. याकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन बाणूरगड, ताडाचीवाडी व कुसबावडे या तीन गावांसाठी मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

येत्या आठवड्यात बैठक

भारत दूरसंचार निगम व खासगी कंपन्यांना पत्रव्यवहार केला होता. परंतु, ग्रामपंचायत निवडणुका, अन्य प्रशासकीय कामे व कोरोनामुळे बैठक घेता आली नाही. येत्या आठवड्यात विटा तहसील कार्यालयात बैठक घेऊन यावर तोडगा काढला जाईल, असे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी सांगितले.

जनआंदोलनाचा इशारा

खानापूर पूर्वभागातील या तीन गावांतील नागरिक व विद्यार्थ्यांचे मोबाईल नेटवर्कअभावी हाल होत आहेत. या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेकापचे संघटक कॉ. गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दिला.

Web Title: Due to lack of network students have to sit on the roof of their house and study online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.