शिक्षण मंडळाच्या गळक्या इमारतीत सर्वत्र पाणीच पाणी!

By Admin | Updated: June 2, 2015 00:34 IST2015-06-02T00:34:41+5:302015-06-02T00:34:41+5:30

कर्मचाऱ्यांची कसरत : पाठपुरावा करूनही दुर्लक्ष

Drinking water everywhere in the leaky building of the Education Board! | शिक्षण मंडळाच्या गळक्या इमारतीत सर्वत्र पाणीच पाणी!

शिक्षण मंडळाच्या गळक्या इमारतीत सर्वत्र पाणीच पाणी!

सांगली : शहरातील शाळा क्र. ६ मध्ये असलेल्या महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात सर्वत्र पाण्याचेच साम्राज्य पसरले आहे. ऐन शाळा प्रवेशाच्या काळातच प्रवेशद्वारापासून चिखल तुडवितच पालकांना कार्यालयाची पायरी चढावी लागत आहे. कार्यालयातील आतील सर्व भिंती पाण्याने चिंब भिजल्या असून सर्वत्र कुबट वास येत आहे. तेथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या तसेच कागदपत्रेही पाण्याने भिजली आहेत.
शैक्षणिक वर्ष सुरु झाले असले तरी, शाळा क्र. ६ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत दफ्तर सांभाळत पाण्यातून वाट काढतच जावे लागणार आहे. कारण शाळेच्या क्रीडांगणावर सर्वत्र पावसाचे पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रशासनाने कोणतीच व्यवस्था केली नसल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासही क्रीडांगण उपलब्ध होणे अवघड झाले आहे. शाळेच्या वरील बाजूस दुसऱ्या मजल्यावर प्राथमिक शिक्षण मंडळाचे कार्यालय आहे. तेथील कर्मचाऱ्यांनाही प्रवेशद्वारापासून कार्यालयात प्रवेश करण्यासाठी तारेवरची कसरत दररोज विनातक्रार करावी लागत आहे. जिन्यावर अस्वच्छता आहे. कार्यालयाच्या बहुतांश भिंती तसेच छत पावसाच्या पाण्याने भिजले आहे. छतावरुन तर पाणी सतत गळत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या खुर्च्याही भिजल्या आहेत. त्यामुळे तेथे बसून दैनंदिन कामकाज करणे म्हणजे कर्मचाऱ्यांना शिक्षाच आहे.
कार्यालयातील जमिनीवर पाणी साचले आहे. तसेच टेबलांवर ठेवलेल्या फायली भिजल्या आहेत. प्रारंभी मंडळाचे कार्यालय खालच्या मजल्यावर होते. तेथील जमीन खचल्याने पाच वर्षापूर्वी त्याचे स्थलांतर वरील मजल्यावर करण्यात आले. प्रत्येक पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना पावसाच्या पाण्याचा त्रास होत आहे. विजेच्या वायरी देखील पाण्याने भिजल्या आहेत. त्यामुळे तेथे शॉर्टसर्किट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Drinking water everywhere in the leaky building of the Education Board!