अलमट्टी म्हणजे भारत-पाकिस्तान आहे का, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 17:15 IST2025-05-26T17:13:11+5:302025-05-26T17:15:39+5:30
सांगली : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून, त्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलावीत. भयमुक्त महाराष्ट्र ...

अलमट्टी म्हणजे भारत-पाकिस्तान आहे का, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा सवाल
सांगली : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून, त्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलावीत. भयमुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत रविवारी व्यक्त केली. अलमट्टी धरणाच्या उंचीवरून आठवले यांनी भारत-पाकिस्तानची तुलना केली. उंची वाढवण्यास विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आठवले म्हणाले, पुण्यातील घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्याकडील व्हिडीओ पाहिले असता, वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या नसून, हत्याच आहे, हे स्पष्ट होते. दोन कोटी रुपये वैष्णवीच्या आई-वडिलांनी द्यावेत, या मागणीसाठी वैष्णवीचा सतत छळ केला जात हाेता. तिला त्रास दिला जात होता. याप्रकरणी जे संशयित आरोपी आहेत, त्या सर्वांवर खुनाचा गुन्हा नोंद करावा. यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात दलित आणि महिलांवर अत्याचार वाढत असून, ते रोखण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलावीत.
कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास आमचा विरोध असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, कर्नाटक आणि महाराष्ट्र म्हणजे भारत पाकिस्तान आहे का ? अलमट्टीची उंची वाढवल्यास त्याचा धोका परिसरातील गावांना होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देवू, तसेच कर्नाटक सरकारशीही समन्वय साधू, असे स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संधी द्या
आठवले म्हणाले, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुका होतील. महायुतीकडून रिपाइंला या निवडणुकीत जागा मिळाव्यात, याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरात लवकर बैठक घ्यावी.
ठोकळे यांच्याकडे राज्याची जबाबदारी
माझ्या दौऱ्यात कार्यकर्ते दिसून येतात, मात्र त्यानंतर रिपाइं दिसून येत नाही. पूर्वी पँथरच्या माध्यमातून दलित, शोषितांसाठी लढा उभारला जायचा. तसे काम अपेक्षित आहे. माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्याकडे राज्याची जबाबदारी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सांगलीसह राज्यात चांगली बांधणी केली जाईल.
२९ मेला मुंबईत महारॅली
आठवले म्हणाले, पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. त्यांच्या या शौर्याचे कौतुक करण्यासाठी ‘रिपाइं’तर्फे भारत जिंदाबाद महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २९ मे रोजी मुंबईत ही महारॅली होईल.