जिल्हा बॅँकेची मोबाईल एटीएम बँकिंग सेवा

By Admin | Updated: March 20, 2015 23:16 IST2015-03-20T22:47:06+5:302015-03-20T23:16:57+5:30

शैलेश कोतमिरे : यात्रा-जत्रांमध्ये व्हॅन फिरणार

District Bank's Mobile ATM Banking Service | जिल्हा बॅँकेची मोबाईल एटीएम बँकिंग सेवा

जिल्हा बॅँकेची मोबाईल एटीएम बँकिंग सेवा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्वसामान्य ग्राहकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी मोबाईल बँकिंग व मोबाईल एटीएम व्हॅनच्या माध्यमातून जिल्हाभर सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्हॅन जिल्ह्यातील यात्रांच्या ठिकाणी जाऊन तेथील ग्राहकांना पैसे उपलब्ध करून देणार आहे. हा उपक्रम राबविणारी पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव बँक असल्याची माहिती प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. ही सेवा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच सुरु होणार आहे.ते म्हणाले, प्रशासक म्हणून कारभार हाती घेतल्यापासून बँक तोट्यातून बाहेर काढली आहे. माणगंगा, महांकाली, वसंतदादा साखर कारखान्यांच्या थकबाकीचा प्रश्न सुटला आहे. सध्या बँक एनपीएतून बाहेर पडली आहे. नाबार्डचे सर्व निकष पूर्ण करणारी बँक आहे. ७५ कोटींनी बँकेच्या ठेवी वाढल्या असून, २३३ कोटींचा स्वीय निधीही आहे. सध्या बँकेने ग्राहकांना उत्तम सेवा देण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून मोबाईल बँकिंग व मोबाईल एटीएम व्हॅन ही बँकिंग सेवा सुरू केली आहे. एटीएमला बायोमेट्रिक स्कॅनर, इनबिल्ट कॅमेरा, आॅडिओसह मशीन आहे. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच बँकेचे रूपे डेबीट कार्डचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर अन्य बँकेच्या खातेदारांनाही पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या मोबाईल व्हॅनमध्ये नियमित बँकेचे व्यवहार करणे सोपे होण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही तेथे नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)


पहिल्या टप्यात येथे जाणार व्हॅन
पहिल्या टप्प्यामध्ये वसगडे (ता. पलूस) शाखेच्या ब्रम्हनाळ येथे दर सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ आणि खटाव येथे दर सोमवारी दुपारी २. ३० ते ४. ३०, नरसिंगपूर (ता. वाळवा) या शाखेच्या कार्यक्षेत्रातील किल्लेमच्छिंद्रगड येथे दर मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १, कृष्णा कारखाना दर मंगळवारी दुपारी १. १५ ते २. ३०, शिरटे येथे दर मंगळवारी दु. ३ ते ४. ३०, आळसंद (ता. खानापूर), बलवडी (भा.) येथे दर बुधवारी सकाळी १० ते दुपारी १२. ३०, खंबाळे दर बुधवारी दु. १ ते २. ३०, वाझर येथे दर बुधवारी दु. ३ ते ४. ३०, सांगली येथे दर रविवारी आणि गुरुवारी व्हॅन असणार आहे.

Web Title: District Bank's Mobile ATM Banking Service