Sangli: जयंत पाटील विरोधी आघाडीत बिघाडी, गटनेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 19:57 IST2025-11-08T19:56:19+5:302025-11-08T19:57:59+5:30
Local Body Election: भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे स्पष्ट

Sangli: जयंत पाटील विरोधी आघाडीत बिघाडी, गटनेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने परिणाम
अशोक पाटील
ईश्वरपूर : एकीकडे आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ईश्वरपुरातील प्रभागानुसार उमेदवारी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र गटनेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने विकास आघाडीमध्ये सध्यातरी बिघाडी आहे. एकमत होण्यासाठी खमके नेतृत्व नसल्याने विकास आघाडी होण्यास विलंब लागत आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आनंदराव मलगुंडे प्रचाराला लागले आहेत. दि. ७ रोजी प्रभागानुसार मुलाखतीही सुरू केल्या आहेत. याउलट भाजपमध्येही दुफळी झाल्याने महाडिक, डांगे गट आणि रयत क्रांती संघटना एकत्रित येऊन सावकार काॅलनीमध्ये मुलाखतीचे आयोजन केले आहे. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी नगराध्यक्ष पदासह इच्छुक नगरसेवकांच्या चर्चा करून अर्ज घेतले.
याउलट उरुण परिसरातून भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक विक्रम पाटील यांनी आपल्या निवासस्थानी भाजपमधीलच इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेतले. त्यामुळे सध्यातरी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विकास आघाडीतील शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी पालिका निवडणुकीची तयारी केली असून वेळ आल्यास सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन लढू, अन्यथा सर्वच प्रभागातून स्वतंत्रपणे लढू, असा इशारा विकास आघाडीस दिला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती याअगोदरच घेतल्या आहेत. फक्त विकास आघाडीची मोट बांधल्यानंतर उमेदवारी जाहीर करतील, असा राजकीय वर्तुळातून अंदाज व्यक्त केला जात आहे.
एकंदरीत सर्वच पक्षातील गटनेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने सध्यातरी आघाडीची बिघाडीचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या नेत्यांना एकत्रित आणण्यासाठी खमक्या नेतृत्वाची आवश्यकता आहे.
दि. ८ रोजी विकास आघाडीतील सर्व नेत्यांची बैठक घेऊन अगोदर प्रभागानुसार उमेदवारी निश्चित केली जाईल. त्यानंतर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे नाव जाहीर करू. - आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख शिवसेना