वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पर्यायी अभ्यासक्रमांचे दोर कापले; अजब फेऱ्यांनी विद्यार्थी, पालक चक्रावले

By अविनाश कोळी | Published: September 6, 2023 06:03 PM2023-09-06T18:03:11+5:302023-09-06T18:03:40+5:30

एमबीबीएसचा पहिला पर्याय संपल्यानंतर आयुर्वेद, बीडीएस, बीएचएमएस असे पर्याय विद्यार्थ्यांकडून स्वीकारले जातात

Discontinued optional courses in the medical admission process; Students, parents were confused | वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पर्यायी अभ्यासक्रमांचे दोर कापले; अजब फेऱ्यांनी विद्यार्थी, पालक चक्रावले

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पर्यायी अभ्यासक्रमांचे दोर कापले; अजब फेऱ्यांनी विद्यार्थी, पालक चक्रावले

googlenewsNext

अविनाश कोळी

सांगली : गुणांच्या आधारे एमबीबीएसचा पहिला पर्याय संपल्यानंतर आयुर्वेद, बीडीएस, बीएचएमएस असे पर्याय विद्यार्थ्यांकडून स्वीकारले जातात. मात्र, आयुर्वेदाच्या अगोदर बीडीएसची प्रक्रिया संपुष्टात येणार असल्याने विद्यार्थ्यांकडे गुणानुसार असलेले पर्यायी अभ्यासक्रमांचे दोर कापले गेले गेले आहेत. अशा अजब फेऱ्यांमुळे विद्यार्थी-पालक चक्रावून गेले आहेत.

सीईटी सेलमार्फत एम.बी.बी.एस. आणि बी.डी.एस. अभ्यासक्रमाच्या दोन प्रवेश फेऱ्या पार पडल्या असून तिसरी प्रवेश फेरी ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. १५ सप्टेंबरला निवड यादी घोषित होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबर ते २० सप्टेंबरपर्यंत प्रवेश घ्यावा लागेल. या फेरीत प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्याच्या पुढील प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. तसेच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्दही करता येणार नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्या फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ८ सप्टेंबरपर्यंतच प्रवेश रद्द करता येणार आहे.

दरम्यान, आयुष अभ्यासक्रमांची खासगी महाविद्यालयांसाठीची १५ टक्के केंद्रीय प्रवेश फेरीची पहिली निवड यादी १३ सप्टेंबरला घोषित होणार असून ८५ टक्के राज्य कोट्यासाठीची पहिल्या फेरीची निवड यादी १४ सप्टेंबरला घोषित होणार आहे. बीडीएसला प्रवेश घेतलेल्या, पण आयुष अभ्यासक्रमांना इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वेळापत्रक अत्यंत अडचणीचे आहे. आयुषची निवड यादी घोषित होण्यापूर्वीच बीडीएसला घेतलेला प्रवेश रद्द करता येणार नसल्यामुळे ज्यांनी बीडीएसला प्रवेश घेऊन ठेवलेला आहे असे विद्यार्थी आयुषच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत.

त्याचप्रमाणे बीडीएसच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आयुषच्या दुसऱ्या फेरीतही सहभागी होता येणार नाही. त्यांना मिळालेला प्रवेश रद्द करता येणार नाही. त्यामुळे आयुषला प्रवेश मिळाला नाही तर बीडीएसचा प्रवेश घेण्याची मानसिकता असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक अडचणीचे ठरले आहे. आयुष अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा त्यांचा मार्गच बंद झालेला आहे.


नीट परीक्षेत २५० ते ३५० गुण असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आयुर्वेद शाखेत प्रवेश न मिळाल्यास दंत वैद्यकीय शाखेला प्रवेश घ्यायचा असतो. सीईटी सेलच्या वेळापत्रकामुळे आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यास, दंत वैद्यकीय शाखेत प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना अवघड होणार आहे. दंत वैद्यकीय शाखेत प्रवेश घेतला नाही आणि आयुर्वेद शाखेला प्रवेश मिळाला नाही तर काय करायचे, हासुद्धा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण होणार आहे. त्यामुळे बीडीएस की बीएएमएस प्रवेशाचा निर्णय विद्यार्थ्यांना आधीच घ्यावा लागणार आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली

Web Title: Discontinued optional courses in the medical admission process; Students, parents were confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.