चंद्राबाबू नायडू उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात २५ मंत्री होणार सामील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 02:29 PM2024-06-11T14:29:25+5:302024-06-11T14:31:18+5:30

चंद्राबाबू नायडू राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.

chandrababu naidu take oath as andhra pradesh cm on june 12, 25 ministers included in cabinet | चंद्राबाबू नायडू उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात २५ मंत्री होणार सामील

चंद्राबाबू नायडू उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात २५ मंत्री होणार सामील

विजयवाडा : आंध्र प्रदेशातचंद्राबाबू नायडू यांचे नवे सरकार स्थापन होणार आहे. उद्या म्हणजेच १२ जून रोजी चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यासंदर्भात चंद्राबाबू नायडू यांनी विजयवाडा येथील ए कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एनडीएच्या सर्व १६४ आमदारांसोबत बैठक घेतली. यावेळी चंद्राबाबू नायडूंच्या मंत्रिमंडळात एकूण २५ मंत्री असतील. यामध्ये टीडीपीचे १९, जनसेनेचे ४ आणि भाजपचे २ मंत्री असणार आहेत. 

लोकसभा निवडणुकीसह झालेल्या १७५ विधानसभा जागांच्या आंध्र प्रदेश विधानसभेत टीडीपीसोबत असलेल्या एनडीएने एकतर्फी विजय मिळवला होता. या निवडणुकीत टीडीपीचे १३५ आमदार, अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेनेचे २१ आमदार आणि भाजपचे ११ आमदार निवडून आले आहेत. दरम्यान, बैठकीनंतर टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू म्हणाले, "भाजप, जनसेना आणि टीडीपीच्या सर्व आमदारांनी एनडीए सरकारमध्ये आंध्र प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री होण्यासाठी मला संमती दिली आहे."

दरम्यान, टीडीपीचे अध्यक्ष अच्चन नायडू, भाजपचे पुरंदेश्वरी आणि जनसेनेचे पवन कल्याण हे राज्यपालांची भेट घेणार आहेत. एनडीए विधीमंडळचा नेता निवड करण्यात आल्याचा प्रस्ताव राज्यपालांना दिला जाणार आहे. यानंतर चंद्राबाबू नायडू राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्राबाबू नायडू बुधवारी सकाळी ११.२७ वाजता विजयवाडा विमानतळाजवळ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान मोदीही सहभागी होणार आहेत. 

याआधी पवन कल्याण उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र, पवन कल्याण हे अभिनेते असल्यामुळे त्यांनी अनेक चित्रपट साइन केले आहेत. अशा परिस्थितीत ते सध्या चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे समजते. यावेळी चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र नारा लोकेश हे सुद्धा मंत्री होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजच्या बैठकीनंतर चंद्राबाबू नायडू यांच्या घरी आणखी एक बैठक होणार आहे, ज्यामध्ये नायडू मंत्रिमंडळाचा भाग असणाऱ्या आमदारांनाच बोलावले जाईल, असे म्हटले जात आहे.
 

Web Title: chandrababu naidu take oath as andhra pradesh cm on june 12, 25 ministers included in cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.