संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 03:18 PM2024-06-11T15:18:35+5:302024-06-11T15:20:45+5:30

२४ आणि २५ जून रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात नवीन खासदारांचा शपथविधी होऊ शकतो.

special session of parliament from 24 june lok sabha speaker may be elected | संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या...

संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या...

नवी दिल्ली : देशात मोदी सरकार ३.० सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पदभार स्वीकारला आहे. तसेच, सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. यानंतर आता २४ जूनपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होऊ शकते. यासोबतच २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेचे आठ दिवसांचे विशेष अधिवेशन २४ जून ते ३ जुलैपर्यंत चालणार आहे. २४ आणि २५ जून रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात नवीन खासदारांचा शपथविधी होऊ शकतो. त्याचबरोबर लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक २६ जूनला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी केंद्र सरकारकडून सर्वप्रथम एका खासदाराचे नाव प्रस्तावित केले जाईल. विरोधकांनी सरकारचा प्रस्ताव एकमताने मान्य केल्यास निवडणुका होणार नाहीत. तसे न झाल्यास विरोधकही आपल्या बाजूने उमेदवार उभे करू शकतात.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन्ही सभागृहांच्या म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करू शकतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या अभिभाषणातून केंद्रातील मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा अजेंडा मांडतील. याचबरोबर, या संसदेच्या विशेष अधिवेशनात काँग्रेससह इतर विरोधी पक्ष अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. अलीकडेच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी NEET-UG वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या विवादावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.

दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर झाले. यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने २९३ जागा जिंकल्या होत्या. निकालानंतर केंद्रात एनडीएचे सरकार येणार आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार हे अगदी स्पष्ट झाले होते. यानंतर ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ७२ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १० जून रोजी सर्व मंत्र्यांमध्ये खात्यांचे वाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये राजनाथ सिंह संरक्षण मंत्री, अमित शहा गृहमंत्री, निर्मला सीतारामन अर्थमंत्री आणि एस जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रीपदी कायम ठेवण्यात आले आहेत.

Web Title: special session of parliament from 24 june lok sabha speaker may be elected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.