संकटातही सलग सहा वर्षे जिल्हा बँक नफ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST2021-04-12T04:23:59+5:302021-04-12T04:23:59+5:30

सांगली : दुष्काळ, नाेटाबंदी, अतिवृष्टी, महापूर, कोरोना अशा एकामागोमाग एक संकटांच्या मालिकानंतरही जिल्हा बँकेने सलग सहा वर्षे नफ्याची परंपरा ...

Despite the crisis, the district bank has been profitable for six consecutive years | संकटातही सलग सहा वर्षे जिल्हा बँक नफ्यात

संकटातही सलग सहा वर्षे जिल्हा बँक नफ्यात

सांगली : दुष्काळ, नाेटाबंदी, अतिवृष्टी, महापूर, कोरोना अशा एकामागोमाग एक संकटांच्या मालिकानंतरही जिल्हा बँकेने सलग सहा वर्षे नफ्याची परंपरा कायम राखली. आर्थिक नियोजनाचा एक आदर्श जिल्हा बँकेने घालून दिला असून, केवळ बड्या थकबाकीदार संस्थांच्या वसुलीचे एकमेव आव्हान आता बँकेसमोर आहे.

प्रशासकांच्या ताब्यातून जेव्हा ही बँक संचालक मंडळाकडे आली, तेव्हा अनेकांनी बँकेच्या भवितव्याची चिंता व्यक्त केली होती. प्रशासक येण्यापूर्वीच्या संचालक मंडळाने अनेक चुकीचे निर्णय घेतल्यामुळे बँक अडचणीत आली होती. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाबद्दलही तसाच दृष्टिकोन अनेकांचा होता.

बँकेच्या अध्यक्षपदी दिलीपतात्या पाटील आणि उपाध्यक्षपदी संग्रामसिंह देशमुख यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कुशल नेतृत्वाने बँकेला योग्य दिशा दिली. दिलीपतात्या पाटील हे जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे जयंतरावांनी त्यांना बँकेत काम करण्याची पूर्ण मुभा दिली. त्याचे सकारात्मक परिणाम बँकेवर झाले. संचालक मंडळातील वेगवेगळ्या पक्षाच्या, विचारांच्या राजकारण्यांची मोट बांधून त्यांनी तब्बल सहा वर्षांची वाटचाल केली. या सहा वर्षांत त्यांनी सलग बँकेचे नफ्याचे पारडे जड ठेवले.

राजकारण्यांपेक्षाही बाहेरील संकटांनी जिल्हा बँकेला हैराण केले. दुष्काळ, नोटाबंदी, अतिवृष्टी, महापूर, कोरोना या सर्व संकटांच्या काळात कर्जाची वसुली करताना बँकेला अडचणी आल्या. नोटाबंदीच्या काळात देशातील अनेक वित्तीय तपास यंत्रणांनी बँकेला हैराण केले, तरीही यातून तावून सुलाखून निघत, बँकेने प्रगतीची घौडदौड सुरू ठेवली. त्यामुळे नफा वाढत गेला. राज्यातील आघाडीच्या जिल्हा बँकेत सांगली जिल्हा बँकेने स्थान मिळविले.

चौकट

असा वाढला नफा

वर्ष ढोबळ नफा

२०१५-१६ ८४.७० कोटी

२०१६-१७ ५१.६५ कोटी

२०१७-१८ ७२.९६ कोटी

२०१८-१९ १०५.६८ कोटी

२०१९-२० ९२.३९ कोटी

२०२०-२१ १२७.४७ कोटी

चौकट

... तर बँक राज्यात क्रमांक एकवर येणार

जिल्हा बँकेच्या बड्या दहा थकबाकीदार संस्थांकडे सहाशे कोटींची थकबाकी आहे. यातील अनेक संस्था आता जिल्हा बँकेच्या मालकीच्या झाल्या आहेत. त्यांची विक्री करून वसुली केल्यास जिल्हा बँकेचा पुढील वर्षीचा नफा दोनशे कोटींचा आकडा गाठू शकतो, याशिवाय सांगली जिल्हा बँक राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचेल.

Web Title: Despite the crisis, the district bank has been profitable for six consecutive years