दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा बाजारपेठा सुरू करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST2021-04-09T04:28:18+5:302021-04-09T04:28:18+5:30

सांगली : व्यापारी पेठांवरील निर्बंध मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम आम्ही सरकारला देत आहोत. निर्बंध मागे न घेतल्यास येत्या ...

Decide in two days, otherwise the markets will start | दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा बाजारपेठा सुरू करू

दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा बाजारपेठा सुरू करू

सांगली : व्यापारी पेठांवरील निर्बंध मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम आम्ही सरकारला देत आहोत. निर्बंध मागे न घेतल्यास येत्या सोमवारपासून आम्ही बाजारपेठा सुरू करू, असा इशारा शहरातील व्यापाऱ्यांनी गुरुवारी बैठकीत दिला.

व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी कापडपेठ येथे विविध व्यापारी संघटना, विविध पक्षांचे नेते यांची बैठक घेतली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक अभिजित भोसले, पान महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी, ज्येष्ठ व्यापारी तात्यासाहेब गडदे, रवी खराडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर, युसूफ जमादार, हॉटेल असोसिएशनचे शैलेश पवार आदी उपस्थित होते.

समीर शहा म्हणाले, असोसिएशनने दिलेल्या मुदतीप्रमाणे शुक्रवारीच सर्व व्यवसाय सुरू करायचे ठरले होते; पण मुख्यमंत्र्यांबरोबर राज्यातील सर्व शिखर संघटनांची बैठक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांची मुदत मागत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार संयम ठेवून सर्वच संघटनांनी उद्यापर्यंत थांबायचे, असा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांत निर्णय शासनाकडून झाला नाही, तर शनिवार, रविवारचा लॉकडाऊन झाल्यावर सोमवारी महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवसाय सुरू करण्यात येईल.

नगरसेवक भोसले म्हणाले, अन्यायी लॉकडाऊनमुळे जिल्ह्याचे, पर्यायाने शहराचे अर्थचक्र थांबणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून व्यापार सुरू झाला पाहिजे. यासाठी आम्ही गुन्हे दाखल करून घेण्यास तयार आहोत.

अजित सूर्यवंशी यांनी शहराच्या व्यापारासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. यासाठी एकजूट हवी. सर्व संघटनांची एक कृती समिती स्थापन करावी, अशी मागणी केली.

महापौर सूर्यवंशी म्हणाले, या प्रश्नाबाबत जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती देण्यात येईल. सकारात्मक निर्णय घेण्यास मी त्यांना विनंती करेन. इतर सर्व नेत्यांनी सोमवारी दुकाने उघडताना आम्ही व्यापाऱ्यांसोबत सोबत उभे राहू, असे आश्वासन दिले.

चौकट

मोर्चावर टीका

या बैठकीत आ. सुधीर गाडगीळ यांनी काढलेल्या मोर्चावर काही व्यापाऱ्यांनी टीकाही केली. हॉटेल संघटनेचे अध्यक्ष सतीश पवार यांनी गाडगीळ यांच्या मोर्चाला हजेरी लावली आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत येऊन मोर्चावरच टीका केली. ते म्हणाले, मी सांगलीकर म्हणून मोर्चात गेलो होतो. याठिकाणी व्यापारी मोर्चात सहभागी नव्हते. भाजपचे नेते जिल्हाधिकाऱ्यांना वेगळेच सांगत होते. आम्हाला गट-तट नको, नियम पाळायला आम्ही तयार आहोत.

Web Title: Decide in two days, otherwise the markets will start