Sangli Crime: आर्थिक व्यवहारातून वाद; कुपवाडमध्ये चालत्या कारमध्ये सराईत गुन्हेगाराकडून गोळीबार, एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:02 IST2025-11-18T13:55:38+5:302025-11-18T14:02:18+5:30
चार तासांत संशयित जेरबंद: जखमीवर उपचार सुरू

Sangli Crime: आर्थिक व्यवहारातून वाद; कुपवाडमध्ये चालत्या कारमध्ये सराईत गुन्हेगाराकडून गोळीबार, एकजण जखमी
कुपवाड : शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश ऊर्फ पिल्या आनंदा पारछे (वय २८, रा. सिद्धनाथ कॉलनी, भारत सूतगिरणीजवळ, कुपवाड) याच्यावर आर्थिक देवाणघेवाणीतून रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून चालत्या कारमध्ये गोळीबार करण्यात आला. मांडीला गोळी लागून पारछे गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री २ वाजता घडली.
जखमीवर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार तासांतच संशयितांना अटक केली. राहुल सुभाष माने (वय ३४, रा. संकल्पनगर, बामणोली, ता. मिरज), गणेश सदाशिव खोत (३५, रा. शांत कॉलनी, कुपवाड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महेश पारछे, त्याचे दोन मित्र राहुल माने आणि गणेश खोत हे तिघे रविवारी मध्यरात्री भारत सूतगिरणी चौकातून कुपवाडकडे चारचाकी वाहनातून (क्र. एमएच १० ईआर ८२६२) जात होते. संशयित राहुल माने व त्याचा मित्र गणेश खोत या दोघांचा महेश पारछे याच्यासोबत पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला.
यावेळी गणेश खोत याने महेश पारछे याला बुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून तुला जिवंत ठेवत नाही, अशी धमकी दिली. संशयित राहुल माने याने चिडून महेश पारछे याला ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. ही गोळी पारछे याच्या डाव्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला. जखमी पारछेवर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांची तातडीने धाव
गोळीबार झाल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या उपस्थितीत कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गोपनीय बातमीदारामार्फत कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी चार तासांतच संशयित राहुल माने व गणेश खोत यांना जेरबंद केले. गुन्हेगारांनी गुन्ह्यात वापरलेली १५ लाख रुपये किमतीची चारचाकी पोलिसांनी जप्त केली.
तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार
संशयित राहुल माने व गणेश खोत तसेच जखमी महेश ऊर्फ पिल्या पारछे हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. पारछे याच्याविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर माने व खोत या दोघांविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.