Sangli ZP: राष्ट्रवादी, शिंदेसेनेला गृहित धरून आघाडी, युतीची गणिते; आम्ही स्वतंत्र असल्याचा अजित पवार गटाचा पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 12:16 IST2026-02-14T12:15:56+5:302026-02-14T12:16:18+5:30
अध्यक्षपदाच्या वाटाघाटी सभापतीपदावर थांबण्याची शक्यता

Sangli ZP: राष्ट्रवादी, शिंदेसेनेला गृहित धरून आघाडी, युतीची गणिते; आम्ही स्वतंत्र असल्याचा अजित पवार गटाचा पवित्रा
सांगली : जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनाचे ट्विस्ट अद्याप कायम आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोहोंचे बहुमत अत्यंत काठावर असल्याने पक्षनेत्यांमध्ये वाटाघाटी जोरात सुरु आहेत. शुक्रवारीही बैठका आणि खल सुरु होता.
सत्तास्थापनेत महत्वाची भूमिका असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाने पाठिंब्यासाठी अध्यक्षपदाची अट घातल्याने आघाडी व युतीपुढे पेच निर्माण झाला आहे. गुरुवारी सायंकाळी अजित पवार गटाने मिरजेत झालेल्या बैठकीत अध्यक्षपदावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव पक्षनेत्या व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देण्यात येणार आहे. या गटाचे ६ सदस्य निवडून आले आहेत. आघाडी व युतीला स्पष्ट बहुमतासाठी अजित पवार गटाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच पवार गट आक्रमक स्थितीत आहे.
दुसरीकडे शिंदेसेनेची भूमिकाही पवार गटाइतकीच महत्वाची ठरली आहे. पक्षाचे ७ सदस्य निवडून आले आहेत. पण पक्षनेते आमदार सुहास बाबर यांनी पाठिंब्याविषयी जाहीर वाच्यता अद्याप केलेली नाही. महायुतीचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता येईल असे वक्तव्य करताना शिंदेसेनेचे ७ सदस्य जमेत धरले आहेत. त्यामुळे पक्षाच्या पाठिंब्यासाठी भाजपश्रेष्ठींचे प्रयत्न सुरु आहेत.
आम्हाला गृहित धरु नका!
राज्यात महायुतीमध्ये अजित पवार गट सहभागी आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेची तयारी करताना भाजपने पवार गटाचे संख्याबळ गृहीत धरले आहे. त्यांचे ६ सदस्य सोबत घेऊन बहुमताचा पल्ला गाठता येईल आणि जिल्हा परिषदेत आपलीच सत्ता येईल, असा भाजपचा हिशेब आहे.
दुसरीकडे आघाडीच्या सदस्यांनीही बहुमताची बेरीज करताना पवार गटाला जमेत धरले आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा राज्यपातळीवर सुरू आहे. शिवाय सांगलीत शिराळा तालुक्यातही दोन्ही पक्ष जिल्हा परिषदेसाठी एकत्र लढले आहेत. पवार गटाचा पाठिंबा गृहीत धरताना आघाडीकडून हे दोन दाखले दिले जात आहेत. मात्र पवार गटाने युती आणि आघाडी या दोहोंना धुडकावून लावले आहे. आम्हाला गृहित धरू नका, असा स्पष्ट संदेश दिला आहे.
उपाध्यक्ष, सभापतीपदावर साटेलोटे?
अजित पवार गट किंवा शिंदेसेनेशी वाटघाटी करताना उपाध्यक्षपद किंवा सभापतीपदाचा पर्याय पुढे आणला जात आहे. अध्यक्षपदावर अडून न राहता उपाध्यक्षपदासह एक-दोन सभापतीपदे घ्यावीत, असा प्रस्ताव मांडला जात आहे. तो मान्य होण्यावरच सत्तेचे गणित जमणार आहे.