उमेदवाराच्या कार्यालयासमोर सांगलीत गुंडाचा निर्घृण खून, चाकू गळ्यात अडकला; हल्लेखोर पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:51 IST2026-01-10T13:50:43+5:302026-01-10T13:51:04+5:30
चेतन हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या कमरेला शस्त्राचे कव्हर आढळले

उमेदवाराच्या कार्यालयासमोर सांगलीत गुंडाचा निर्घृण खून, चाकू गळ्यात अडकला; हल्लेखोर पसार
सांगली : महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच शहरातील संवेदनशील अशा शामरावनगरमध्ये रात्री साडेअकराच्या सुमारास चेतन आप्पासाहेब तांदळे (वय १८ रा. शामरावनगर ) या युवकाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला. चेतन हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या कमरेला शस्त्राचे कव्हर आढळले आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, एका उमेदवाराच्या कार्यालयासमोर हा खून झाल्याने खळबळ उडाली होती.
शहरातील शामरावनगर हा संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. निवडणुकीमध्ये या प्रभागावर पोलिसांची करडी नजर आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चेतन तांदळे यांच्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. चेतनच्या डोक्यावर गळ्यावर आणि पोटावर खोलवर वाढ झाल्यानंतर तो गंभीर जखमी होऊन खाली पडला. एक चाकू त्याच्या गळ्यातच अडकून पडला. रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर शस्त्र टाकून हल्लेखोर पळाले.
खुनाची माहिती मिळतात पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिस पथकाला तपासाबाबत सूचना दिल्या. चेतनच्या खुनानंतर शामरावनगर परिसर तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नागरिकांची गर्दी जमली होती.
पूर्ववैमनस्यातून खून
पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असला तरी उमेदवाराच्या कार्यालयासमोर हा प्रकार घडल्याने सुरुवातीला वेगळी चर्चा रंगली होती. सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जमलेली गर्दी हटवून पंचनामा सुरू केला. पोलिस उपअधीक्षक संदीप भागवत, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव तसेच गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी तत्काळ पथके रवाना करण्यात आली.