बनवाबनवी अशी ही बनवाबनवी; सांगलीत टर्की पक्ष्याच्या नावाखाली बॉयलर कोंबडीच्या पिलांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:42 IST2025-11-24T17:41:32+5:302025-11-24T17:42:20+5:30
परप्रांतीय तरुणांचा उद्योग, ५० रुपयांना एक पिलू, पक्षीमित्रांच्या इशाऱ्यानंतर पलायन

बनवाबनवी अशी ही बनवाबनवी; सांगलीत टर्की पक्ष्याच्या नावाखाली बॉयलर कोंबडीच्या पिलांची विक्री
सांगली : टर्की पक्षी म्हणून बॉयलर कोंबडीची पिले विकण्याचा प्रकार सध्या शहरात सर्वत्र सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा फसव्या विक्रेत्यांना पकडले. ग्राहकांची फसवणूक न करण्याविषयी ताकीद दिली. कोंबडीची पिले ताब्यात घेतली.
सांगली शहरात व उपनगरात काही परप्रांतीय तरुण बॉयलर कोंबडीच्या छोट्या पिलांची विक्री करताना दिसत आहेत. आठवडी बाजारातही पिलांची विक्री सुरू आहे. ४० ते ५० रुपयांना एक पिलू विकले जाते. ही पिले टर्की पक्ष्याची असल्याचे सांगितले जाते. मांसाहारासाठी टर्की पक्ष्यांना मोठी मागणी आहे. त्याचा गैरफायदा घेतला जातो. दोन-अडीच महिन्यांत पिलू मोठे होऊन टर्की पक्षी तयार होईल असे हे तरुण सांगतात.
शेतकऱ्यांना टर्की पक्षी विकून व्यवसायदेखील करता येतो असेही सांगतात. लोकांचा विश्वास बसावा यासाठी शेजारीच एक मोठा टर्की पक्षीही ठेवला होता. त्यामुळे या पिलांच्या खरेदीसाठी लोक गर्दी करीत होते. गेल्या सोमवारपासून शहरात ठिकठिकाणी पिलांची विक्री सुरू होती. कोल्हापूर रस्त्यावरही अनेक ठिकाणी हे तरुण बॉयलर कोंबडीची पिले घेऊन थांबले होते.
काही पक्षीमित्रांना याची माहिती मिळाली. पाहणी केली असता टर्की पक्ष्याच्या नावाने फसवेगिरी सुरू असल्याचे आढळले. सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मुजावर यांनी पिले ताब्यात घेतली. संबंधित तरुणांना फसवेगिरीच्या कारणास्तव पोलिसांत नेण्याचा इशारा दिला. त्यानंतर विक्रेत्या तरुणांनी पुन्हा अशी फसवी विक्री करणार नसल्याचे सांगत काढता पाय घेतला.