दहावी, बारावी परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी बोर्डाने अवलंबला निवडणूक पॅटर्न, नेमका काय.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:58 IST2025-01-20T13:57:19+5:302025-01-20T13:58:56+5:30
आजपासून कॉपीविरोधी जनजागृती सप्ताह

दहावी, बारावी परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी बोर्डाने अवलंबला निवडणूक पॅटर्न, नेमका काय.. जाणून घ्या
सांगली : दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी शाळेच्या बाहेर कितीही बंदोबस्त असला, तरी शाळेतच सामूहिक कॉपी होत असल्याच्या तक्रारी अनेकदा पुढे आल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी परीक्षा मंडळाने आता निवडणुकीचा पॅटर्न अवलंबला आहे. निवडणुका येताच स्थानिक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. त्यांची मतदारसंघाबाहेर उचलबांगडी केली जाते. त्याच धर्तीवर परीक्षेसाठीही आता संबंधित शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांची अन्य शाळेत नियुक्ती केली जाणार आहे.
परीक्षेतील गैरमार्गाशी लढा देण्यासाठी सोमवारपासून जनजागृती सप्ताह सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षांना कोल्हापूर विभागीय मंडळातून अडीच लाख विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. परीक्षेत विविध मार्गांनी होणाऱ्या गैरप्रकारांचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो. ते रोखण्यासाठी सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कॉपीमुक्त परीक्षा अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी संबंधित शाळांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली केली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती बाहेरील शाळेतून केली जाईल. यामुळे सामूहिक कॉपी किंवा अन्य गैरप्रकारांना आळा बसेल असा विश्वास कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कोल्हापूर विभागात बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
आजपासून जनजागृती सप्ताह
जनजागृती सप्ताहात कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीची माहिती देणे, कॉपीमुक्तीची शपथ घेणे, शाळास्तरावर शिक्षासूचीचे वाचन करणे, परीक्षा काळातील आहार व आरोग्याच्या काळजीबाबत उद्बोधन करणे, उत्तरपत्रिका लेखनाविषयी मार्गदर्शन, शाळा परिसरात जनजागृती, ग्रामसभेत कॉपीमुक्तीची माहिती देणे असे उपक्रम राबविले जाणार आहेत.