Sangli Crime: अलिशान वाहनातून येऊन केल्या चोऱ्या, बड्या भंगार व्यावसायिकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:43 IST2025-05-20T16:43:04+5:302025-05-20T16:43:15+5:30
डिव्हीआरमुळे सापडले धागेदोरे, ५ लाखांचा माल जप्त

Sangli Crime: अलिशान वाहनातून येऊन केल्या चोऱ्या, बड्या भंगार व्यावसायिकास अटक
शिराळा : दहा लाखांच्या अलिशान वाहनातून येत एका बड्या भंगार व्यावसायिकाने मांगले (ता. शिराळा) येथे तीन ठिकाणी चोरी केल्याचा प्रकार उजेडात आला. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पाच लाखाचे चोरीतील साहित्य जप्त केले आहे. याचपद्धतीने त्याने अनेकठिकाणी चोऱ्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
हंबीरराव ऊर्फ अमित सावळा गोसावी (वय ४२, रा. गोसावी वस्ती कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून ५ लाख ५५ हजार १३५ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरी प्रकरणातील दिपक उर्फ लंगड्या गोसावी, अनिल उर्फ बारक्या गोसावी (दोन्ही रा. तासगाव, जि. सांगली ) हे दोघे अद्याप फरार आहेत. या संशयितांनी पेठ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेले दोन गुन्हे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहेत.
मांगले येथे चोरट्यांनी गुरूवारी १ मे रोजी रात्री पावणे दहा ते शुक्रवारी २ मे रोजी सकाळी आठपर्यंत चोरी केली होती. एक परमिट रूम, रूद्राक्ष मल्टीपर्पझ हॉल तसेच दत्तात्रय यादव यांच्या घरात त्यांनी चोरी केली होती.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपअधिक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, सहाय्यक निरीक्षक राहूल अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमर जाधव व पोलिस नाईक उमेश शेटे यांनी गोपनीय, तांत्रिक माहिती तसेच सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने तपास करून हंबीरराव गोसावी या संशयित आरोपीस कोडोली येथे राहत्या घरातून अटक केली.
माल केला जप्त
चोरीसाठी वापरलेले वाहन तसेच ९ हजार ८८५ हजारांची दारू, १५ हजारांचा ॲम्प्लिफायर, ५ हजाराची ईको मशीन, माईक, मोबाइल, १५ हजार रुपयांचा डी.व्ही. आर, ३ हजाराची वायर असा माल जप्त केला.
तो निघाला बडा व्यावसायिक
संशयित हंबीरराव गोसावी हा उच्चभ्रू घराण्यातील बडा भंगार व्यवसायिक आहे. त्याच्या घरातून चोरीचा माल पोलिसांनी हस्तगत केला. त्यास अलोरे (ता. चिपळूण) येथे मार्च २०२४ मध्ये महावितरण कार्यालयातील चोरी प्रकरणात दोन वेळा अटक करण्यात आली होती.
डिव्हीआरमुळे सापडले धागेदोरे
पोलिसांनी जप्त केलेल्या दोन सीसीटीव्ही डिव्हीआर हे २२ मार्च व २३ एप्रिल रोजीचे असून मंगरायाची वाडी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील चोरीतील असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याठिकाणी एल. पी. जी. बॉटलिंग प्लॅन्टमध्ये दोनवेळा चोरी करून तीन लाखाचे १३ हजार ११० सिलिंडरचे पितळी व्हॉल्व लंपास केले होते.
गॅस बर्नर, पितळी घागरीमुळे शोध
मांगले येथील चोरीत कोणतेही धागेदोरे नव्हते. मात्र, गॅस बर्नर व पितळी घागरी चोरीस गेल्या होत्या. यावरून चोरटा भंगार व्यावसायिक असावा, असा अंदाज बांधून या चोरीचा पोलिसांनी छडा लावला.