सांगलीत बँकेची १ कोटी ३७ लाखांची फसवणूक, चिंचणीच्या पाच जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:42 IST2025-10-03T15:41:41+5:302025-10-03T15:42:12+5:30

साडेपाच वर्षांनंतर प्रकार उघडकीस

Bank fraud of Rs 1 crore 37 lakhs in Sangli case against five people from Chinchani | सांगलीत बँकेची १ कोटी ३७ लाखांची फसवणूक, चिंचणीच्या पाच जणांवर गुन्हा

सांगलीत बँकेची १ कोटी ३७ लाखांची फसवणूक, चिंचणीच्या पाच जणांवर गुन्हा

सांगली : प्रत्यक्ष तारण मिळकतीचे मूल्यांकन कमी असल्यामुळे दुसऱ्याच्या जादा मिळकतीचे मूल्यांकन तारण दाखवून वाई अर्बन बँकेची १ कोटी ३७ लाख ३४ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत चिंचणी (ता. तासगाव) येथील पाच जणांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित संगीता सतीश गवळी (वय ३९), सतीश बाबासाहेब गवळी (वय ४६), संतोष बाबासाहेब गवळी (वय ४९), जामीनदार मारुती राजाराम गवळी (वय ५३) आणि शिवलिंग दगडू पाखरे (वय ७८, सर्व रा. चिंचणी, ता. तासगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

गवळी यांना वाई अर्बन बँकेने ३० डिसेंबर २०१९ रोजी ७० लाख रुपये कर्ज दिले होते. गवळी यांनी कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले नाहीत. त्यामुळे कर्ज आणि व्याजासह थकबाकी १ कोटी ३७ लाख ३४ हजार रुपयांपर्यंत गेली.

बँकेने थकबाकी वसुलीसाठी प्रक्रिया सुरू केल्यानंतर त्यांना तारण म्हणून दाखवलेल्या मिळकतीचे मूल्यांकन कमी असून, गवळी यांनी दुसऱ्याच्या मिळकतीचे मूल्यांकन दाखवून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले.

साडेपाच वर्षांनंतर प्रकार उघडकीस

२०१९ ते ३० सप्टेंबर २०२५ या काळात कर्ज थकीत ठेवून, दुसऱ्याच्या मिळकतीचे मूल्यांकन तारण म्हणून सादर करून फसवणूक केल्याचा प्रकार साडेपाच वर्षांनंतर उघडकीस आला. त्यामुळे शाखाधिकारी रोहित जमखंडीकर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Bank fraud of Rs 1 crore 37 lakhs in Sangli case against five people from Chinchani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.