Sangli Crime: पेन्शन मंजूर करून देण्याचे आमिष; महाडिकवाडीत वृद्ध महिलेची २० लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:03 IST2025-11-20T18:03:06+5:302025-11-20T18:03:26+5:30
पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

Sangli Crime: पेन्शन मंजूर करून देण्याचे आमिष; महाडिकवाडीत वृद्ध महिलेची २० लाखांची फसवणूक
जत : येथील महाडिकवाडी (शेगाव, ता. जत) येथील वृद्ध महिलेला संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन योजना मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २० लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खरेदीचा बनावट दस्त करून पाचजणांनी जमीन विक्री करून पैसे वाटून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. श्रीमती आक्काताई श्रीमंत महाडिक (वय ७७, रा महाडिकवाडी, शेगाव) असे फसवणूक झालेल्या वृद्धेचे नाव आहे.
याप्रकरणी अनिल रावसाहेब नलवडे, जालिंदर बापू नलवडे, सागर जालिंदर नलवडे,अविनाश सोपान महाडिक, अतुल सोपान महाडिक (सर्व रा. महाडिकवाडी, शेगाव) या पाच संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ते ३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव करत आहेत.
बनावट दस्त करुन जमीनीची विक्री
महाडिकवाडी शेगाव येथील वृद्ध आक्काताई महाडिक या आजारी असल्याचा फायदा घेत अनिल नलवडे,जालिंदर नलवडे, सागर नलवडे,अविनाश महाडिक, अतुल महाडिक या पाचजणांनी “संजय गांधी पेन्शन योजना मंजूर करून देतो” असे सांगून विश्वासात घेतले. यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात अंगठा घेऊन खरेदीचा बनावट दस्त करून घेतला. जमीन विक्रीतून मिळालेली २० लाखांची रक्कम परस्पर वाटून घेत फिर्यादीची सरळसरळ फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.