एअर गनच्या धाकाने कुटुंबाला लुटण्याचा प्रयत्न, सांगलीत दोघांना जमावाने चोपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:13 IST2025-10-04T13:13:18+5:302025-10-04T13:13:18+5:30
दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार

एअर गनच्या धाकाने कुटुंबाला लुटण्याचा प्रयत्न, सांगलीत दोघांना जमावाने चोपले
सांगली : शहरातील रतनशीनगरजवळील अंबाईनगरमध्ये गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एका बंगल्यात घुसलेल्या दोघा गुन्हेगारांनी एअर गन व चाकूच्या धाकाने सोने, पैशाची मागणी केली. परंतु कुटुंबाच्या प्रसंगावधानाने कॉलनीतील लोकांना हा प्रकार समजला. त्यांनी बंगल्यासमोर येऊन दोघांना पकडून बेदम चोप दिला.
सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने दोघे बचावले. संशयित सौरभ रवींद्र कुकडे (रा. दत्तनगर, पसायदान शाळेजवळ, सांगली) व रोहित बंडू कटारे (रा. फौजदार गल्ली) या दोघांना अटक केली आहे.
सांगलीतील रतनशीनगरजवळ अंबाईनगर या उच्चभ्रू वस्तीत कापड दुकानदार दिवेश नरेंद्र शहा (वय ५५) यांचा बंगला आहे. गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ते आणि पत्नी बंगल्यात होते. तेव्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ कुकडे आणि रोहित कटारे बंगल्यासमोर आले. बेल वाजविल्यानंतर दिवेश शहा यांनी दरवाजा उघडला असता, दोघेजण आत घुसले. त्यानी एअर गन आणि चाकूचा धाक दाखविल्यामुळे शहा घाबरले.
दोघांनी त्यांच्याकडे सोने व पैशाची मागणी केली. सोने व पैसे दिले नाहीत तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. दिवेश यांच्या पत्नीने आतून हा प्रकार पाहिल्यानंतर प्रसंगावधान राखले. त्यांनी हळूच पाठीमागच्या दरवाजाने बाहेर जाऊन शेजारील नागरिकांना घडलेला प्रकार सांगितला.
त्यामुळे काही वेळातच परिसरातील नागरिक काठ्या घेऊन बंगल्याकडे धावले. नागरिकांना पाहून दोघे पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना पकडले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी तसेच काठ्यांनी चोप देण्यास सुरुवात केली. अनेकांनी गर्दी हात धुऊन घेतला. दोघेजण रक्तबंबाळ झाले.
सांगली शहर पोलिसांना हा प्रकार कळविताच उपनिरीक्षक महादेव पोवार, कर्मचारी गौतम कांबळे तत्काळ घटनास्थळी धावले. गौतम कांबळे यांनी धाडसाने जमावाच्या तावडीतून दोघांची सुटका केली. परंतु जमाव संतप्त होता. त्यांनी पोलिसांसमक्ष दोघांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी कायदा हातात घेऊ नका, असे बजावल्याने जमाव शांत झाला. त्यामुळे दोघेजण बचावले. जखमी दोघांना तत्काळ सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
याप्रकरणी दिवेश शहा यांनी शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद नोंदविली. त्यानुसार दोघांवर जबरी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. उपचारानंतर दोघांना अटक केली. शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, सहा ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार
सौरभ कुकडे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर रोहित कटारे याच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.