बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीच्या आमिषाने आटपाडीच्या कुटुंबाची ६ लाखांची फसवणूक; बनावट आदेश, खोटे शिक्के व स्वाक्षऱ्यांचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:14 IST2026-01-14T17:12:36+5:302026-01-14T17:14:03+5:30
चार जणांविरोधात गुन्हा दाखल

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीच्या आमिषाने आटपाडीच्या कुटुंबाची ६ लाखांची फसवणूक; बनावट आदेश, खोटे शिक्के व स्वाक्षऱ्यांचा वापर
आटपाडी: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आटपाडी तालुक्यातील एका कुटुंबाची तब्बल सहा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बनावट शासकीय कागदपत्रे, खोटे शिक्के व बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, साहेबराव महादेव वाघमारे (वय ४९, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. आवळाई, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी अरविंद भगवान शिकतोडे, सुनील शिकतोडे, राजू शिलवंत आणि राजू शिलवंत यांचा मेव्हणा (सर्व राहणार माहीत नाही) यांनी फिर्यादीच्या मुलाला, आनंद, यास बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन वेळोवेळी एकूण ६,५०,००० रुपये घेतले.
दि. १७ फेब्रुवारी २०२३ ते दि. ८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आरोपींनी ही रक्कम स्वीकारली. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपआयुक्त कार्यालयाचा बनावट शिक्का, प्रशासकीय अधिकारी (समिती) यांच्या बनावट स्वाक्षऱ्या वापरून खोटे कार्यालयीन आदेश तसेच बनावट ओळखपत्र तयार करून दिले. मात्र, प्रत्यक्षात फिर्यादीच्या मुलाला कोणतीही नोकरी मिळाली नाही. वारंवार पैसे परत मागूनही आरोपींनी टाळाटाळ केली. अखेरीस, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने दि. १२ जानेवारी २०२६ रोजी आटपाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास आटपाडी पोलिस करत असून, नोकरी लावण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांपासून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके प्रयत्नशील असून, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तपासाला वेग देण्यात आला आहे.