Sangli ZP: अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून पहिले वर्ष अध्यक्षपद आम्हालाच द्या, राष्ट्रवादीची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:58 IST2026-02-17T13:58:29+5:302026-02-17T13:58:56+5:30
प्राथमिक चर्चा निर्णयाविना संपली; चेंडू मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे

Sangli ZP: अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून पहिले वर्ष अध्यक्षपद आम्हालाच द्या, राष्ट्रवादीची भूमिका
सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर श्रद्धांजली म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्या वर्षी आम्हाला द्या, अशी भूमिका पक्षाच्या नेत्यांनी मांडली.
सोमवारी मिरजेत शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) निशिकांत पाटील, माजी खासदार संजय पाटील, शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्यासह अमोल बाबर, जनसुराज्यचे नेते समित कदम यांची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेत सत्तास्थापना आणि अध्यक्षपदासह विविध पदांचे वाटप याविषयी चर्चा झाली.
राष्ट्रवादी कॉंग्रेेसने अध्यक्षपदाचा दावा प्रदेशाध्यक्षांपर्यंत नेला आहे. तोच दावा आज भाजपसोबतच्या बैठकी कायम ठेवला. पालकमंत्री पाटील हे सोमवारी शासकीय कार्यक्रमासाठी सांगलीत आले होते, तत्पूर्वी त्यांनी महायुतीतील पक्षांसोबत संवाद साधला. दुपारी सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष अध्यक्षपदावर ठाम असल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत भाजपसह महायुती आणि पहिले वर्ष अध्यक्षपदाची संधी हा प्रस्ताव पक्षनेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठविला आहे. त्याचा पुनरुच्चार आज पालकमंत्र्यांपुढे केला.
शिंदेसेनेनेही अध्यक्षपदाचा रेटा कायम ठेवला. यासंदर्भात आमदार सुहास बाबर हे दोन दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला कसा असेल, याबाबत भाजपचा प्रस्ताव मांडला. प्रत्येकी सव्वा वर्षांचे चार अध्यक्ष करण्याचा तोडगा पुढे केला. भाजपचे संख्याबळ मोठे असल्याने पहिला अध्यक्ष आमचाच होईल असेही स्पष्ट केले. मात्र यावर एकमत होऊ शकले नाही. आता अंतिम निर्णय तीनही पक्षांच्या मुंबईस्थित नेत्यांशी चर्चेनंतर होणार आहे.
अशा राजकारणात आम्ही सत्तेत कसे येणार?
आमदार सुहास बाबर यांनी या बैठकीत जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविषयी तक्रार उपस्थित केली. पडळकर यांच्या खानापूर-आटपाडी मतदारसंघातील त्रासदायक आणि विरोधी भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्याकडून असे राजकारण होत असल्याने त्यांच्यासोबत आम्ही सत्तेत सहभागी का व्हावे, असा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. पाठिंब्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चेनंतरच घेता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी महायुतीत सहभाग आणि पहिल्या वर्षी अध्यक्षपदाची मागणी यासंदर्भात आम्ही दोन दिवसांत पक्षनेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटणार आहोत. स्थानिक परिस्थितीविषयी चर्चा करू निर्णय घेणार आहोत. - निशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार)