Sangli Crime: पूर्ववैमनस्यातून अनुगडेवाडीत दोन कुटुंबांत सशस्त्र हाणामारी, नऊजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:53 IST2025-11-24T16:53:47+5:302025-11-24T16:53:58+5:30
पलूस पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद

Sangli Crime: पूर्ववैमनस्यातून अनुगडेवाडीत दोन कुटुंबांत सशस्त्र हाणामारी, नऊजण जखमी
पलूस : अनुगडेवाडी (ता. पलूस) येथे दोन कुटुंबांत पूर्ववैमनस्यातून लोखंडी रॉड, काठ्या, तलवार, खुरपे यासारख्या हत्यारांसह हाणामारी झाली. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. हाणामारीत दोन्ही गटांतील नऊजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पलूस पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील हल्लेखोरांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले आहेत.
फिर्यादी रमेश वसंत अनुगडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे, दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास आमणापूर चौक येथे संकेत भीमराव अनुगडे यांनी यापूर्वी बहिणीला दिलेल्या त्रासाचा राग मनात धरून जबर मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर अजित, सुजीत, स्वप्नील आणि संकेत अनुगडे या चौघांनी मिळून लोखंडी रॉड, काठीने हल्ला केला. बहिण साक्षी हिच्यावर तलवारीने वार केल्यामुळे ती जखमी झाली आहे. तसेच फिर्यादी रमेश अनुगडे व त्यांचा मुलगा समर्थ हेदेखील गंभीर जखमी झाले. तसेच आरोपींनी रमेश यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
स्वप्नील श्यामराव अनुगडे (वय २१, रा. अनुगडेवाडी) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दोन्ही कुटुंबांत पूर्वीपासून वाद सुरू आहे. त्याचाच राग मनात धरून रमेश अनुगडे, संकेत अनुगडे, समर्थ अनुगडे आणि सुजाता अनुगडे यांनी घरासमोर धिंगाणा घालत मारहाण केली. त्यांनी लोखंडी बार, तलवार आणि रॉडने फिर्यादी स्वप्नील, बहीण साक्षी, आई उज्ज्वला तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेले चुलतभाऊ संकेत, सुजीत आणि अजित अनुगडे या सर्वांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हाणामारीत संशयितांनी मोटारीची तोडफोड केली आहे. पोलिस निरीक्षक सोमेश्वर जंगम तपास करीत आहेत.
गावात पोलिस बंदोबस्त तैनात
दोन कुटुंबातील हाणामारीत नऊजण जखमी झाले आहेत. काहींना डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. सशस्त्र हाणामारीमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. पलूस पोलिसांनी परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.