Sangli: अमेरिकेच्या विहानपाठोपाठ आता नागालँडच्या अंशचा येलूरच्या मराठी शाळेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:30 IST2025-06-25T17:29:55+5:302025-06-25T17:30:11+5:30

मराठी शाळांच्या गुणवत्तेवर पालकांचा विश्वास वाढत असल्याचे अधोरेखित

Ansh Narendra Buddhe a student from the Army's School Rifle in Nagaland has been admitted to the Zilla Parishad in Yelur Sangli | Sangli: अमेरिकेच्या विहानपाठोपाठ आता नागालँडच्या अंशचा येलूरच्या मराठी शाळेत प्रवेश

Sangli: अमेरिकेच्या विहानपाठोपाठ आता नागालँडच्या अंशचा येलूरच्या मराठी शाळेत प्रवेश

इस्लामपूर : नागालँड येथील लष्कराच्या स्कूल रायफलमधून अंश नरेंद्र बुढ्ढे या विद्यार्थ्याचा येलूर (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात प्रवेश झाल्याने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा दूरदूरपर्यंत उमटला आहे.

अंशचे वडील नरेंद्र बुढ्ढे हे नागालँडच्या सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लष्करी सेवेत आहेत. अमेरिकेहून विहान हा आटपाडीच्या शाळेत आला. त्यापाठोपाठ नागालँड येथून अंशसुद्धा आल्याने मराठी शाळांच्या गुणवत्तेवर पालकांचा विश्वास वाढत असल्याचे अधोरेखित होत आहे.

अंश हा आपल्या आईवडिलांसोबत नागालँड राज्यात वास्तव्यास होता. तेथे त्याने लष्कराच्या स्कूल रायफलमधून पहिल्या इयत्तेचे शिक्षण घेतले. मात्र, त्याला तेथे गोडी वाटत नव्हती. त्यामुळे आजोबा गजानन बुढ्ढे यांनी नातू अंश याला येलूरच्या मराठी शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेतून मिळणारे ज्ञान इंग्रजीत मिळू शकत नाही, अशी त्यांची ठाम धारणा आहे.

अंशचे वडील आणि आजोबांनी येलूर शाळेतील उत्कृष्ट शिक्षणाचा दर्जा प्रत्यक्ष अनुभवला होता. मराठी भाषा इंग्रजीपेक्षा सरस असून, संस्कृतीची जपणूक आणि संस्कार इंग्रजी शाळांमध्ये मिळत नाहीत, असा त्यांचा विश्वास आहे. 

पुढची पिढी संस्कारक्षम राहावी, यासाठी त्यांनी गावातील जिल्हा परिषदेची मराठी शाळा निवडली. शाळा प्रशासनाने अंशचा फुलदाणी आणि शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार केला. गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांनी शाळेला अचानक भेट देऊन या नव्या प्रवेशाचे कौतुक केले. त्यांनी शाळेची तपासणी करताना शैक्षणिक गुणवत्तेबद्दल प्रशंसा केली आणि शिक्षकांना प्रोत्साहन दिले.

जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे मार्गदर्शन शाळेला नेहमीच लाभत आहे. यावेळी केंद्रप्रमुख सुधाकर पाटील, मुख्याध्यापक दिनकर नांगरे, उपशिक्षक विजय कोळी, तंत्रस्नेही शिक्षक अनिल लांडगे, उपशिक्षिका पाटील, फिरोजा तांबोळी, सुरेखा जाधव, संगीता सूर्यवंशी व पालक उपस्थित होते.

Web Title: Ansh Narendra Buddhe a student from the Army's School Rifle in Nagaland has been admitted to the Zilla Parishad in Yelur Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.