अण्णासाहेब पाटीलचा अखेर ताबा मिळाला

By Admin | Updated: December 19, 2014 23:52 IST2014-12-19T23:46:15+5:302014-12-19T23:52:04+5:30

पतसंस्था घोटाळा : न्यायालयात नेणार

Annasaheb Patil finally got control | अण्णासाहेब पाटीलचा अखेर ताबा मिळाला

अण्णासाहेब पाटीलचा अखेर ताबा मिळाला

सांगली : येथील जिल्हा परिषद आवारातील अण्णासाहेब पाटील जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेत सुमारे सव्वाबारा कोटींचा अपहार केल्याचा आरोप असलेला संस्थेचा संस्थापक-अध्यक्ष अण्णासाहेब पाटील याचा ताबा आर्थिक गुन्हे शाखेला आज, शुक्रवारी सायंकाळी न्यायालयाच्या आदेशाने मिळाला. त्याला उद्या (शनिवार) न्यायालयात उभे केले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी सांगितले.
अण्णासाहेब पाटील हा गेल्या चार महिन्यांपासून फरारी होता. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. यामुळे तो चार दिवसांपूर्वी सांगलीच्या न्यायालयात शरण आला होता. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तो शरण आल्याची पोलिसांना माहिती नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्याचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने ताबा घेण्यास अखेर परवानगी दिली. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज, शुक्रवारी सायंकाळी सांगलीच्या कारागृहातून त्याला ताब्यात घेतले.
यासंदर्भात निरीक्षक डोंगरे म्हणाले की, पाटीलचा ताबा घेतला आहे. त्याला अटक करुन उद्या (शनिवार) न्यायालयात उभे केले जाणार आहे. घोटाळ्यातील तो मुख्य संशयित आहे. फरारी असलेल्या अन्य दोन संशयितांबाबत त्याच्याकडे चौकशी केली जाईल. त्यांच्यावरही लवकरच अटकेची कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)

Web Title: Annasaheb Patil finally got control