Shaktipeeth Highway: अंकलीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला, खासदार विशाल पाटलांनी दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 18:22 IST2025-07-02T18:20:48+5:302025-07-02T18:22:23+5:30

शासनाविरोधात जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला

Angry farmers blocked the highway in Ankli, MP Vishal Patil warned of Nirvana, said.. | Shaktipeeth Highway: अंकलीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला, खासदार विशाल पाटलांनी दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले..

Shaktipeeth Highway: अंकलीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला, खासदार विशाल पाटलांनी दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले..

सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्दच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कुटुंबीयासह नागपूर-रत्नागिरी महामार्ग मंगळवारी सकाळी अंकली (ता. मिरज) येथे रोखला. तासभर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. शासनाविरोधात जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

खासदार विशाल पाटील, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी, महिला, मुलांसह आंदोलनात उतरले होते. भर पावसात महिलांसह शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारला होता. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच जोरदार विरोध सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही आहे हे रास्ता रोकोच्या माध्यमातून दाखवून दिला. रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे एक रुग्णवाहिका आल्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिला.

"शेती आमच्या हक्काची नाही, नाही कुणाच्या बापाची", "या सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय" अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अंकली फाटा परिसर दणाणून सोडला होता. यावेळी प्रभाकर तोडकर, प्रवीण पाटील, उमेश एडके, लता कांबळे, बाळासाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात यशवंत हारूगडे, रघुनाथ पाटील, अधिक पाटील, विष्णू पाटील, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, अनिल माळी, अरुण पाटील, एकनाथ कोळी, बाळासाहेब लिंबेकाई, सुधाकर पाटील, रावसाहेब पाटील, अरुण कवठेकर, संतोष आंबी आदी उपस्थित होते.

महेश खराडेसह आठ जणांना अटक

आंदोलनामधील प्रमुख महेश खराडे यांच्यासह भरत चौगुले, श्रीधर उदगावे, उमेश एडके, भूषण गुरव, प्रदीप माने, महावीर चौगुले, शांतीनाथ लिंबेकाई आदी आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या आंदोलकांना पोलिसांनी सोडून दिले.

टक्केवारी लाटण्यासाठीच शक्तिपीठ महामार्गाचा घाट : विशाल पाटील

आम्ही विकासाच्या विरोधात नाही. मात्र, या महामार्गांवर अनेक ठिकाणी मोठे पूल होत आहेत. त्यामुळे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. किती भराव टाकला जाणार असून, महापूर काळात किती पाणी येईल, त्याचा किती शहरे आणि किती गावांना फटका बसणार आहे. या सर्व बाबींचा विचार सरकारने करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठीच शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. तो रद्दच झाला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द करण्यासाठी प्रसंगी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर, असा निर्वाणीचा इशारा खासदार विशाल पाटील यांनी दिला.

आमदार, खासदारांना जगवण्यासाठीच 'शक्तिपीठ' : महेश खराडे

स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष महेश खराडे म्हणाले, कृषी दिनादिवशीच शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे, ही शोकांतिका आहे. वर्धा ते गोवा येथील शेतकऱ्यांची शक्तिपीठ महामार्गाची मागणी नाही. या महामार्गासाठी शासन २० हजार कोटीचे कर्ज काढणार आहे. त्यामुळे राज्य आणखी कर्जबाजारी होणार आहे. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही तो डावलून पोलिसी बळाचा वापर करून मोजणी प्रक्रिया सुरू आहे. हा अट्टाहास कशासाठी सुरू आहे. ठेकेदार, आमदार, खासदार जगविण्यासाठी सुरू आहे हे स्पष्ट होते, असा आरोपही त्यांनी केला.

Web Title: Angry farmers blocked the highway in Ankli, MP Vishal Patil warned of Nirvana, said..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.