Sangli Politics: महायुतीत गडबड, महाविकास आघाडीत पडझड
By अविनाश कोळी | Updated: May 17, 2025 19:35 IST2025-05-17T19:35:05+5:302025-05-17T19:35:29+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला अडथळ्यांची शर्यत

Sangli Politics: महायुतीत गडबड, महाविकास आघाडीत पडझड
अविनाश कोळी
सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मैदान सज्जतेची तयारी सुरू असताना गोंधळलेल्या राजकीय भूमिकांच्या संभ्रमाचे ढग दाटले आहेत. महाविकास आघाडीत संघटनात्मक भिंतीची पडझड सुरू आहे, तर महायुतीत मित्रपक्षांमधील सूर बिघडले आहेत. त्यामुळे मैदानात युती, आघाडीचे झेंडे फडकणार की स्वबळाचा नारा देत स्वतंत्र पक्षांचे शड्डू घुमणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडी व महायुतीत अनेक मित्रपक्ष असले तरी मुख्य लढत ही भाजप, दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यातच राहणार आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या कार्यक्षेत्रात आतापासून निवडणुकांच्या दृष्टीने इच्छुकांची चाचपणी सुरू झाली आहे. मात्र, पक्षीय भूमिकांवरून गोंधळ सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमार्फत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची मते विचारात घेऊन काही ठिकाणी जागा वाटपाचा तिढा सुटला नाही, तर स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत मात्र अजूनही कोणतीही भूमिका ठरलेली नाही. राज्य स्तरावर याबाबतची भूमिका स्पष्ट नसल्याने आघाडीत संभ्रम आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेसमध्ये फारसे सख्य नाही. अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला दिसतात. महायुतीतही भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सूर जुळत नसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी शिंदेसेनेचे तर मोजक्या ठिकाणी उद्धवसेनेचे अस्तित्व दिसून येत असले तरी प्रमुख पक्षांच्या तुलनेत ते फार नगण्य आहे.
आघाड्यांमधून पळवाट
आष्टा, इस्लामपूर नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात स्थानिक आघाड्या करून निवडणुका लढविल्या जातात. त्यामुळे महाविकास आघाडी किंवा महायुतीचा फाॅर्म्युला या परंपरेला छेद देणार की जुन्या राजकीय परंपरा कायम राखल्या जाणार, हा चर्चेचा प्रश्न आहे.
चौकट
महापालिका क्षेत्रात आघाडीत पडझड
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील महाविकास आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद अधिक होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली आहे. पक्ष सोडण्याकडे अनेकांचा कल आहे. जयंत पाटील यांचे अनेक समर्थक असलेले माजी नगरसेवक अजित पवार गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांची महापालिका क्षेत्रात मोठी पडझड झाल्याचे दिसून येते. दुसरीकडे भाजपची ताकद वाढली आहे.
नगरपालिकांत काय होणार?
इस्लामपूर : मागील नगरपालिका निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची सत्तेपर्यंत जाताना दमछाक झाली. त्यांना काठावर जागा मिळाल्या. त्यांच्या विरोधातील विकास आघाडीने नगराध्यक्षपद पटकाविले होते. सद्यस्थितीत याठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी, भाजप, शिंदेसेना हे पक्ष ताकद आजमावणार आहेत. काँग्रेस पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही.
आष्टा : जयंत पाटील व दिवंगत नेते विलासराव शिंदे यांच्या आघाडीची दीर्घकाळ सत्ता आहे. याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप काहीअंशी ताकद आहे.
जत : मागील पालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित येत सत्ता घेतली होती. यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत देण्याची तयारी असली तरी दोन्हीकडील मित्रपक्षांचे सूर अद्याप जुळले नाहीत.
विटा : गत निवडणुकीत काँग्रेसने सत्ता मिळविली होती. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध शिंदेसेना अशी लढत होण्याची शक्यता आहे.
पलूस : काँग्रेसने याठिकाणी गत निवडणुकीत सत्तास्थापन केली होती. आगामी निवडणुकीत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ताकद आजमावतील. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अरुण लाड, शरद लाड तसेच भाजपचे संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज देशमुख हे नेते पालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची करणार आहेत.
तासगाव : माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वात मागील निवडणुकीत भाजपने सत्ता मिळविली होती. आता संजय पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील यांच्यात पालिकेचा सामना रंगणार आहे.