Sangli: मेसेज करून मध्यरात्री घराबाहेर बोलावले, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीस दहा वर्षांची सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:38 IST2025-11-20T18:37:35+5:302025-11-20T18:38:07+5:30
सकाळच्या सुमारास पीडित मुलगी घरात दिसत नसल्यामुळे तिच्या आईने पोलिस ठाणे गाठले होते

Sangli: मेसेज करून मध्यरात्री घराबाहेर बोलावले, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीस दहा वर्षांची सक्तमजुरी
सांगली : अल्पवयीन मुलीस उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी चंद्रकांत मधुकर लोंढे (वय २६, रा. सोनी, ता. मिरज) याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षातर्फे आरती देशपांडे-साटवलीकर यांनी खटला चालवला.
खटल्याची हकीकत अशी, आरोपी चंद्रकांत लोंढे याचा पीडित मुलीशी संपर्क होता. चार वर्षांपूर्वी २०२१ मध्ये त्याने पीडितेला मोबाइलवरून मेसेज करून मध्यरात्रीनंतर घराबाहेर बोलावले. त्यानंतर मिरज तालुक्यातील एका गावातील शेतात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सकाळच्या सुमारास पीडित मुलगी घरात दिसत नसल्यामुळे तिच्या आईने मिरज ग्रामीण पोलिस ठाणे गाठले.
त्याचवेळी पीडितेस आरोपी चंद्रकांत यांच्या चुलत्याने घरी आणून सोडले. यानंतर पीडितेच्या भावाने तिला घेऊन पोलिस ठाणे गाठले. तेथे घडलेली हकीकत पीडितेने पोलिसांना सांगितली. आरोपी चंद्रकांत याच्याविरुद्ध अपहरण व पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. महिला सहायक पोलिस निरीक्षक पी. सी. बाबर यांनी तपास केला.
खटला न्यायालयात सुनावणीस आल्यानंतर सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता आणि तिची आई यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. तपासी अधिकारी यांनी केलेल्या तपासात पीडिता घटनेवेळी अल्पवयीन होती. आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या साक्षी आणि पुराव्याला अनुसरून विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहंती यांनी आरोपी चंद्रकांत लोंढे यास दोषी धरले. त्यास दहा वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे श्यामकुमार साळुंखे, पैरवी कक्षातील रेखा खोत, सुनीता आवळे, वंदना मिसाळ आदींचे न्यायालयीन कामकाजात सहकार्य लाभले.
पीडितेला नुकसानभरपाई द्या
पीडितेवर झालेल्या अत्याचारापोटी तिला भरीव नुकसानभरपाई शासनाकडून मिळण्याबाबतचे आवश्यक ते निर्देश यावेळी न्यायाधीश मोहंती यांनी दिले.