राज्यात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेस-राष्ट्रवादीतही धाकधूक, सर्व आमदार मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 17:19 IST2022-06-23T17:19:11+5:302022-06-23T17:19:44+5:30
आमदारांबरोबर सर्वच पक्षांचे प्रमुख पदाधिकारीही सध्या मुंबईत आहेत.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेस-राष्ट्रवादीतही धाकधूक, सर्व आमदार मुंबईत
सांगली : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेचे जिल्ह्यातील आमदार मंगळवारी मुंबईत दाखल झाले. राज्यातील वेगवान राजकीय घडामोडींमुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आमदारांना बोलावून एकत्र राहण्याची सूचना दिली आहे. प्रमुख नेते व पदाधिकारीही मुंबईत ठाण मांडून आहेत. जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीची धाकधूक वाढली आहे.
शिवसेनेचे आमदार अनिल बाबर दोन दिवसांपासून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठली होती. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी व काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनाही बोलावून घेण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आ. मानसिंगराव नाईक, आ. सुमनताई पाटील, काँग्रेसचे नेते, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत तसेच भाजपचे आ. सुधीर गाडगीळ व आ. सुरेश खाडे यांनी मुंबई गाठली आहे.
भाजपच्या दोन्ही आमदारांना मंगळवारी रात्री निरोप देण्यात आला. त्यानुसार सकाळी आ. गाडगीळ मुंबईला रवाना झाले. आ. खाडे मंगळवारी रात्रीपासून मुंबईतच आहेत. कोणत्याही क्षणी सरकार पडण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सर्वच आमदारांची धाकधूक वाढली आहे. आपल्या पक्षातील कोणताही आमदार बंडखोरांसोबत जाऊ नये म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीने दक्षता घेतली आहे.
आमदारांबरोबर सर्वच पक्षांचे प्रमुख पदाधिकारीही सध्या मुंबईत आहेत. राज्याप्रमाणे जिल्ह्यातही राजकीय संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सरकार कोणाचे बनणार, यावर आता सर्व गोष्टी अवलंबून असल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही बदलणार आहेत.
राजकीय गोटात शांतता
राज्यातील घडामोडींकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकीय गोटात शांतता पसरली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीत चिंतेचे वातावरण
महाविकास आघाडी सरकार पडण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सत्तेतून अचानक जावे लागणार असल्याने त्यांना भवितव्याची चिंता वाटत आहे.
भाजपच्या गटात आनंद
भाजप सत्तेत येण्याची संधी निर्माण झाल्याने भाजपच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे. नेते व पदाधिकारी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला मुंबईला येण्याची सूचना दिली आहे. त्याप्रमाणे आम्ही आता मुंबईला आलो आहोत. पुढील आदेशाची प्रतीक्षा आहे. - आ. सुधीर गाडगीळ, भाजप