मित्राला परीक्षेला सोडायला निघाला अन् जीव गमावला; सांगलीवाडीत शिवशाहीच्या धडकेत तरुण ठार, मित्र गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 11:52 IST2025-07-17T11:51:55+5:302025-07-17T11:52:08+5:30
हेल्मेट घातले असते तर..

मित्राला परीक्षेला सोडायला निघाला अन् जीव गमावला; सांगलीवाडीत शिवशाहीच्या धडकेत तरुण ठार, मित्र गंभीर जखमी
सांगली : मित्राला स्टेनोच्या परीक्षेला सांगलीत सोडायला निघालेला साहिल अन्सार मुलाणी (वय २२, रा. नागठाणे, ता. पलूस) याच्या मोपेडला शिवशाहीने धडक दिल्यामुळे तो जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र प्रतीक अनिल साळुंखे (१९, रा. बुरूड गल्ली, यल्लमा चौक, इस्लामपूर) हा गंभीर जखमी झाला. सकाळी ८:००च्या सुमारास सांगलीवाडी टोलनाक्याजवळ फल्ले मंगल कार्यालयासमोर हा अपघात घडला. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साहिल मुलाणी हा इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बी. कॉम.ला शिकत होता. प्रतीक साळुंखे हा याच महाविद्यालयात शिकत होता. दोघेही मित्र होते. बुधवारी सकाळी प्रतीक याची ‘स्टेनो’ची परीक्षा सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात होती. त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्यामुळे साहिलला बरोबर घेऊन जाण्याचे ठरवले.
साहिल सकाळी नागठाणे येथून घरातून बाहेर पडला. वाळव्यात दुचाकी पार्क करून बसने तो इस्लामपूरला आला. साहिलने प्रतीकची मोपेड (एमएच. १०, ईडी. ४६९९) चालवण्यास घेतली. दोघेही इस्लामपूरहून सांगलीकडे येत होते. आठच्या सुमारास ते सांगलीवाडी टोलनाक्याजवळ आले. याचवेळी बायपासवरून सांगली-पुणे शिवशाही बस (एमएच. ०९, ईएम. १४७९) निघाली होती. टोलनाक्यापुढे चौकात शिवशाही बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
या धडकेने मोपेडचा पुढचा भाग तुटून चक्काचूर झाला. साहिलच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. पाठीमागे बसलेला प्रतीक गंभीर जखमी झाला. त्याला स्पेशल रेस्क्यू फोर्सने तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला भारती हॉस्पिटलमध्ये हलवले. अपघातानंतर सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एकुलता एक आधार निखळला
साहिल हा नागठाणे येथे आई-वडिलांसह राहात होता. त्याचे वडील अन्सार मुलाणी हे हुतात्मा बझारच्या नागठाणे शाखेत व्यवस्थापक आहेत. मुलाणी दाम्पत्याचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती मृत्यूने दाम्पत्याचा एकुलता एक आधारच निखळला आहे.
हेल्मेट घातले असते तर..
साहिलने बुधवारी सकाळी लवकर सांगलीत मित्र प्रतीकला परीक्षेला सोडायला जाणार असल्याचे सांगितले होते. वडील अन्सार यांनी त्याला ‘हेल्मेट’ घेऊन जाण्यास सांगितले. परंतु, तो गडबडीत विना हेल्मेट इस्लामपूरला गेला. तेथे प्रतीकच्या वडिलांची मोपेड घेऊन सांगलीकडे येताना प्रतीकच्या वडिलांनीही दोघांना हेल्मेट घेण्यास सुचवले. परंतु, हेल्मेट घेणे त्यांनी टाळले. हेल्मेट असते तर जीव वाचला असता अशी चर्चा त्याच्या मित्रांमध्ये सुरू होती.