Sangli: सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले, सुटी काढून पत्नीला भेटायला आला; मित्रांबरोबर फिरायला गेला अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:34 IST2026-01-14T19:33:37+5:302026-01-14T19:34:14+5:30
रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

संग्रहित छाया
पलूस : येरळा नदीकाठावर मोराळ (ता. पलूस) येथील अंधळी निंबळक बंधाऱ्याखाली फिरायला गेलेल्या तीन मित्रांपैकी एक युवक नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. साईप्रसाद समाधान कदम (वय २३, सध्या रा. पलूस, मूळ गाव मोराळे) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
मोराळे येथील साईप्रसाद कदम याचे कुटुंबीय कामानिमित्त पलूस येथे वास्तव्यास आहेत. साईप्रसाद हा मुंबई येथील एका हॉटेलमध्ये कामाला असून, तो सध्या सुटीसाठी गावाकडे आला होता. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तो आपल्या दोन मित्रांसोबत मोराळे परिसरात फिरायला गेला. येरळा नदीकाठावर गप्पा मारत असताना व फोटो, सेल्फी काढत असताना नदीतील शेवाळामुळे साईप्रसादचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात पडून वाहून गेला.
साईप्रसादला पोहता येत नव्हते. त्याच्या दोन मित्रांनाही पोहता येत नसतानाही त्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवाह प्रचंड असल्याने साईप्रसाद दूरवर असलेल्या पाण्याच्या मोठ्या खड्ड्यात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच तासगाव व पलूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्कालीन बचाव पथकाने नदीकाठावर तसेच संबंधित खड्ड्यात शोधमोहीम राबवली; मात्र उशिरापर्यंत साईप्रसादचा शोध लागला नाही.
..अन् काळाचा घाला
साईप्रसाद याचे अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. सुटी काढून तो पलूस येथे पत्नीला भेटण्यासाठी आला असताना साईप्रसादवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.