घरात घुसून चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र कापून नेले, सांगलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 19:07 IST2025-10-25T19:06:15+5:302025-10-25T19:07:34+5:30
तोपर्यंत चोरटा पसार झाला

artificial intelligence
सांगली : सावळवाडी (ता. मिरज) येथे घरात कुटुंबासह गाढ झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र चोरट्याने घरात घुसून कापून नेले. हा प्रकार बुधवारी मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास घडला. याबाबत संगीता विष्णू शिरतोडे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावळवाडी येथे संगीता शिरतोडे या कुटुंबासह राहतात. बुधवारी त्या कुटुंबासह घरात झोपल्या असताना समोरील दरवाजा ढकलून चोरटा आत शिरला. सर्व जण गाढ झोपेत असल्याचे पाहून त्याने संगीता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र कापून नेले.
संगीता यांना जाग आल्यानंतर आरडाओरडा केला; मात्र तोपर्यंत चोरटा तेथून पसार झाला होता. संशयित चोरटा हा तीस ते पस्तीस वयोगटातील असून त्याने लाल टी-शर्ट आणि बरमुडा घातला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.