सांगलीत भरदिवसा शाळेमध्ये नववीच्या विद्यार्थ्यावर खुनी हल्ला, किरकोळ वादातून प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:29 AM2024-01-30T11:29:08+5:302024-01-30T11:29:46+5:30

संशयित वर्गातील विद्यार्थी

A murderous attack on a student of class IX in a day school in Sangli | सांगलीत भरदिवसा शाळेमध्ये नववीच्या विद्यार्थ्यावर खुनी हल्ला, किरकोळ वादातून प्रकार

सांगलीत भरदिवसा शाळेमध्ये नववीच्या विद्यार्थ्यावर खुनी हल्ला, किरकोळ वादातून प्रकार

सांगली : येथील हरभट रस्त्यावरील आरवाडे हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकणाऱ्या सलमान जावेद मुल्ला (वय १४, रा. शंभरफुटी रस्ता) याच्यावर वर्गातीलच एका विद्यार्थ्यांने कोयत्याने मानेवर वार केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. हल्ल्यानंतर संशयित पसार झाला आहे. या प्रकाराने शाळेत खळबळ उडाली होती. गेले काही दिवस दोघांमध्ये वाद सुरू होता.

दरम्यान, जखमी सलमान याच्यावर विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मानेवरील जखमेवर ३५ टाके घालण्यात आले. रात्री उशिरा सांगली शहर पोलिस ठाण्यात खुनी हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इयत्ता नववीमध्ये शिकणारा सलमान आणि संशयित अल्पवयीन मुलगा या दोघांत काही दिवसांपासून किरकोळ कारणातून वाद सुरू होता. एकमेकाला चिडवाचिडवी सुरू होती. दोन दिवसांपूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता. दोघांमधील वाद धुमसत असतानाच संशयिताने सोमवारी दप्तरातून कोयता आणला होता. सायंकाळच्या सुमारास त्याने बाकावर बसलेल्या सलमानवर कोयत्याने मानेवरच थेट वार केला. यावेळी वार अडवताना सलमानच्या हातावरही जखम झाली. 

भर शाळेत हल्ला झाल्यानंतर मुलांमध्ये घबराट निर्माण झाली. मुलांचा आरडाओरड सुरू झाला. जखमी सलमानला शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांनी उचलून सिव्हिलमध्ये उपचारास नेले. तेथून विश्रामबागच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मानेवरील जखमेवर ३५ टाके घालण्यात आले. उपचारानंतर सलमानची प्रकृती थोडीसी स्थिर बनली आहे.

सलमानवर हल्ला केल्यानंतर संशयित हल्लेखोर मुलगा पसार झाला आहे. सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शाळेत जाऊन माहिती घेतली. संशयित हल्लेखोराच्या पालकास बोलावून घेतले. त्यांनाही हा प्रकार ऐकून धक्का बसला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याबाबत हालचाली सुरू होत्या.

पालकवर्गात भीती

हल्ल्यातील जखमी सलमान हा सामाजिक कार्यकर्ते जावेद मुल्ला यांचा मुलगा आहे. हल्ल्यानंतर मुल्ला कुटुंबीय घाबरले होते, तसेच इतर पालकवर्गातही भीतीचे वातावरण होते.

Web Title: A murderous attack on a student of class IX in a day school in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.