Sangli Crime: रेल्वेतून न्यायाधीशांच्या पत्नीची पर्स 'गायब' झाली, पोलिसांनी शोधमोहीम राबवून मिळवून दिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:14 IST2025-12-04T17:13:07+5:302025-12-04T17:14:27+5:30
..अन् चोरीच्या प्रकरणाचा गैरसमज दूर झाला

Sangli Crime: रेल्वेतून न्यायाधीशांच्या पत्नीची पर्स 'गायब' झाली, पोलिसांनी शोधमोहीम राबवून मिळवून दिली
मिरज (जि. सांगली) : मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या न्यायाधीशांच्या पत्नीची पर्स जयसिंगपूर स्थानकाजवळ गायब झाली. पर्समध्ये रोख रक्कम, दागिने आणि मोबाइल असल्याने चोरीची शक्यता वर्तवून रेल्वेपोलिसांनी ताबडतोब तपास सुरू केला. मात्र, तपासात असे समोर आले की पर्स चोरी न होता चुकून एका सहप्रवाशाकडे गेली होती.
मुंबईतील न्यायाधीश गुरुवारी महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित बोगीतून त्यांच्या पत्नीसह कोल्हापूरला येत होते. प्रवासादरम्यान जयसिंगपूर येथे त्यांच्या पत्नीची पर्स गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी कोल्हापुरात रेल्वेपोलिस चौकीत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी तत्काळ तपासास सुरुवात केली.
आरक्षण यादीच्या आधारावर संबंधित बोगीतील प्रवाशांशी संपर्क साधल्यावर, एका सहप्रवाशाने जयसिंगपूरला उतरताना चुकून ही पर्स नेल्याचे स्पष्ट झाले. रेल्वे पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून पर्स सुरक्षित न्यायाधीशांना परत मिळवून दिली आणि चोरीच्या प्रकरणाचा गैरसमज दूर झाला.