Sangli: ऊसतोडणीवेळीच शॉर्टसर्किटने मशीनला लागली आग, मशीनसह ३० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:55 IST2025-01-28T17:55:12+5:302025-01-28T17:55:29+5:30
कोट्यवधीचे नुकसान

Sangli: ऊसतोडणीवेळीच शॉर्टसर्किटने मशीनला लागली आग, मशीनसह ३० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक
समडोळी : समडोळी-कवठेपिरान शिव रस्त्यावरील एका शेतकऱ्याच्या उसाची यांत्रिकी मशीनद्वारे ऊसतोड सुरू असताना शॉर्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीच्या घटनेमध्ये यांत्रिकी मशीनसह परिसरातील २५ ते ३० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि. २७) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
कवठेपिरान (ता. मिरज) येथील शेतकरी तालीवर नामदेव कांबळे यांच्या अडीच एकर उसाची पोरले (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील यांत्रिक मशीनचे मालक अभिजीत शिवाजी काशीद यांच्या यांत्रिकी मशीनद्वारे ऊसतोड सुरू असताना यांत्रिकी मशीनमध्ये बिघाड झाल्याने शॉर्टसर्किटच्या घटनेने आगीने रौद्ररूप धारण केले.
आग परिसरात पसरली. यात नजीकच्या २५ ते ३० एकर क्षेत्रातील उसाने पेट घेतला. उन्हाचा तडाखा, अग्नीचे रौद्ररूप लक्षात घेऊन एका शेतकऱ्याने दूरध्वनीवरून संपर्क साधला असता अग्निशमन पथकाने घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.
यांत्रिकी मशीनसह उसाची कोट्यवधीचे नुकसान
सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे घडलेल्या या दुर्घटनेमध्ये २५ ते ३० एकर ऊस आणि यांत्रिकी मशीन जळाल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळण्याची चर्चा घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांमध्ये सुरू होती.