Sangli News: बोरगावातील बैलगाडी शर्यतीत अपघातात एकाचा मृत्यू; आयोजकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 18:18 IST2025-11-13T18:17:16+5:302025-11-13T18:18:18+5:30
अटी व शर्तींचा भंग करून निष्काळजीपणे शर्यतीचे आयोजन; नायब तहसीलदारांची फिर्याद

संग्रहित छाया
कवठेमहांकाळ : बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी येथे झालेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात एका प्रेक्षकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार संजय गजानन पवार (वय ५३, रा. विश्रामबाग, मिरज) यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार नामदेव पोपट पाटील (रा. बोरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
९ नोव्हेंबर रोजी सकाळी कोड्याचा माळ परिसरातील गट क्र. ७४६, ७४७ आणि ७४८ येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. मात्र, या शर्यतीत उपविभागीय दंडाधिकारी, मिरज यांनी दिलेल्या परवानगीतील अटी व शर्तींचा भंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शर्यतीच्या मैदानाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक बॅरिकेटिंग न लावणे, तसेच प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी सावधगिरीच्या उपाययोजना न करणे, हा निष्काळजीपणा आयोजकांकडून करण्यात आला.
परिणामी, शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात अंबाजी सेखु चव्हाण (वय ६०, रा. करांडेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) या प्रेक्षकाचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे यात्रास्थळी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, असे फिर्यादीत पवार यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात आयोजक नामदेव पोपट पाटील यांच्याविरोधात अटींचा भंग, निष्काळजीपणा आणि मृत्यूस कारणीभूत ठरणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.