Sangli Crime: एक कोटींची फसवणूक, ईश्वरपूरच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:32 IST2025-11-14T16:27:56+5:302025-11-14T16:32:05+5:30
शीतल पाटील व भागीदारांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार अर्ज केला

Sangli Crime: एक कोटींची फसवणूक, ईश्वरपूरच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल
सांगली : शहरातील एका जागेचा व्यवहार पूर्ण करण्याची लेखी खात्री देऊन खरेदीपोटी एक कोटी रूपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी ईश्वरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक शहाजी राजाराम पाटील (रा. ईश्वरपूर) यांच्याविरूद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माजी नगरसेवक शीतल जिनगोंडा पाटील (वय ५८, रा. ताराई पार्क, चिंतामणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सांगलीतील महापालिका हद्दीतील सिटी सर्व्हे नं. ३९३/ १ मधील १.६५ आर. क्षेत्रफळ असलेली जागेपैकी १/३ हक्क हिश्शाची जागा माजी नगरसेवक शीतल पाटील यांनी स्वस्तीवास्तू डेव्हलपर्स एलएलपीतर्फे भागीदारीत घेण्याचे ठरवले होते. ही जागा ईश्वरपूरचे माजी नगरसेवक शहाजी पाटील यांनी त्यांना दाखवली होती. या जागेचा मालक आपणच आहे. तुम्हाला जमिनीचा व्यवहार पूर्ण करून देतो अशी लेखी खात्री देऊन मूळ मालकाशी केलेले करारपत्र दाखवून विश्वास संपादन केला. बाजारभावाप्रमाणे जागेची किंमत ५ कोटी ७३ लाख रूपये इतकी ठरली होती.
शीतल पाटील यांनी शहाजी पाटील यांना दि. १६ सप्टेंबर २०२२, १७ सप्टेंबर २०२२ व दि. १९ सप्टेंबर २०२२ रोजी २५ लाख रूपये धनादेशाद्वारे दिले. तसेच रोख २५ लाख रूपये दिले. एक कोटी दिल्यानंतर खूष खरेदीपत्र नोंद करण्याचे ठरले. त्याप्रमाणे शहाजी पाटील यांनी स्टॅम्पपेपरवर सविस्तर खरेदीपूर्व करारपत्र माधवनगर येथे केले. हा करार नोटरी करण्यात आला. त्यावेळी साक्षीदार म्हणून अनंत मोहन जाधव (रा. पंचशीलनगर) व माजी जि.प. सदस्य शिवाजी डोंगरे यांनी स्वाक्षरी केली.
करारपत्र झाल्यानंतर शीतल पाटील आणि भागीदारांनी कराराप्रमाणे व्यवहार पूर्ण करण्यासाठी शहाजी पाटील यांची भेट घेतली. परंतू त्यांनी मूळ मालकाकडून खरेदीपत्र करून देण्यास टाळाटाळ केली. तसेच इसारतपोटी घेतलेले एक कोटी रूपये परत दिले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शीतल पाटील यांनी तक्रार दिली. त्याची चौकशी होऊन अखेर गुरूवारी संजयनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
चौकशीनंतर गुन्हा दाखल
शीतल पाटील व भागीदारांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची सखोल चाैकशी झाली. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.