Sangli: करगणीत दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, कॉल रेकॉर्डवरून पोलिसांचा तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 15:53 IST2025-07-08T15:53:20+5:302025-07-08T15:53:33+5:30
कारण अस्पष्ट, युवकाने त्रास दिल्याची चर्चा

Sangli: करगणीत दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, कॉल रेकॉर्डवरून पोलिसांचा तपास सुरू
आटपाडी : करगणी (ता. आटपाडी) येथील पाटील मळा परिसरात राहणाऱ्या सायली महादेव सरगर (वय १६) या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेसहा वाजता घडली. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असले तरी मृत सायलीवर कोणाचा दबाव होता का, तिला कोणी त्रास दिला का, याचा शोध पोलिस घेत आहेत. यासाठी तिच्या कॉल रेकॉर्डची माहिती घेण्यात येत आहे.
याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती सायलीच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक विनय बहिर, पोलिस उपनिरीक्षक राजीव केंद्रे व पथकाने पाहणी केली. सहायक पोलिस उपनिरीक्षक एम. एम. आवळे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मृत सायली करगणी येथील बनपुरी रोडवरील पाटील मळा परिसरात राहत होती. ती दहावीत शिकत होती. रविवारी (दि. ७) सकाळी राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. त्यानंतर काही वेळाने कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आली.
सायलीच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात तिचे वडील सचिन सीताराम सरगर (४२, रा. करगणी) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
युवकाने त्रास दिल्याची चर्चा
आत्महत्या केलेल्या मुलीस एका युवकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज करून त्रास दिल्याची चर्चा गावात सुरू असून, त्याबाबतही पोलिसांचा तपास सुरू आहे.