सांगलीत पोलिसांच्या सबसिडीअर कॅन्टीनमध्ये ७४ लाखांचा अपहार, हवालदाराविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 12:14 IST2025-10-18T12:14:07+5:302025-10-18T12:14:26+5:30
कॅश इन हॅन्ड आणि नफ्यात तफावत आढळली

सांगलीत पोलिसांच्या सबसिडीअर कॅन्टीनमध्ये ७४ लाखांचा अपहार, हवालदाराविरुद्ध गुन्हा
सांगली : जिल्ह्यातील पोलिसांना स्वस्तात वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी सुरू केलेल्या ‘संस्कृती सबसिडीअर कॅन्टीन’मध्ये ७४ लाखांचा अपहार झाल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. याबाबत कॅन्टीन व्यवस्थापक, हवालदार भूपेश चांदणे याच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कल्याण शाखेचे निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
तत्कालीन पोलिस अधिक्षक दिलीप सावंत यांनी साधारण दहा वर्षांपूर्वी पोलिसांसाठी कॅन्टीन सुरू केले होते. कॅन्टीनमध्ये स्वस्तात किराणा माल व वेगवेगळ्या वस्तू विक्री होत होत्या. त्यामुळे कॅन्टीनला चांगला प्रतिसाद मिळत होता. किराणा मालासह वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल्स वस्तूंची देखील विक्री होत होती. कॅन्टीनचा व्यवस्थापक असलेल्या हवालदार चांदणे याने साधारणपणे तीन वर्षांपासून कॅन्टीनमध्ये गैरव्यवहार सुरू केला.
लेखापरीक्षक विश्वेश देशपांडे ॲन्ड कंपनीने एक एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या वर्षाचे लेखापरीक्षण केले. तेव्हा सुपरवायझर अकाऊंट कॅश आणि नफ्यात १९ लाख ८० हजारांची तफावत आढळली. स्टॉकमधील तफावत ४ लाख ४८ हजार रूपये, सुपरवायझर डेटर्समध्ये २० लाख ८० हजार रूपये अशी एका वर्षात ४५ लाख ८ हजार ७५५ रूपयांची तफावत आढळली. एक एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या वर्षात २८ लाख ९४ हजार ८१२ रूपयांची तफावत आढळून आली. दोन वर्षांत ७४ लाख ३ हजार ५६७ रूपयांची तफावत आढळल्याबाबत लेखापरीक्षक देशपांडे यांनी अहवाल पोलिस कल्याण विभाग, संशयित व्यवस्थापक चांदणे यांना दिला.
पोलिस कल्याणचे निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी हा अहवाल पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना सादर केला. अधीक्षक घुगे यांनी ३० मे २०२५ रोजी याबाबत चौकशीचे आदेश दिले. आर्थिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक अरूण सुगावकर यांची नियुक्ती केली. त्यांनी १८ जून २०२५ रोजी अधीक्षक घुगे यांना अहवाल सादर केला. अधीक्षक घुगे यांनी व्यवस्थापक चांदणेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक कांबळे यांनी गुरूवारी रात्री संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चांदणे याच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
कॅन्टीनला अखेर टाळे
भूपेश चांदणे याने केलेल्या अपहारानंतर चौकशीदरम्यान कॅन्टीनला टाळे ठोकण्यात आले आहे. दिवाळीत कॅन्टीन सुरू होईल या आशेने अनेकजण हेलपाटे मारत होते. परंतु कॅन्टीन बंदमुळे अनेकांची निराशा झाली.