सांगलीत हद्दपार गुंडासह तिघांकडून ६ पिस्तुले जप्त, पुरवठादार पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:16 IST2026-01-05T18:16:05+5:302026-01-05T18:16:29+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषणची वारणाली परिसरात कारवाई

सांगलीत हद्दपार गुंडासह तिघांकडून ६ पिस्तुले जप्त, पुरवठादार पसार
सांगली : हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून सांगलीत आलेल्या किरण शंकर लोखंडे (वय २४, रा. वाघमोडेनगर, कुपवाड) आणि साथीदार अभिजित अरुण राणे (वय ३२, रा. शारदानगर, सांगली), तुषार नागेश माने (वय ३०, लक्ष्मीनगर, हडको कॉलनी) या तिघांकडून सहा पिस्तुले, तीन काडतुसे जप्त केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. मध्यप्रदेशातील पाजी हा उमराटी, पोस्ट बलवाडीतील पुरवठादार पसार आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुन्हे अन्वेषणच्या पथकाला अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर आणि कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करून सूचना दिल्या होत्या. पथकातील कर्मचारी संकेत कानडे, पवन सदामते, अभिजित माळकर, सूरज थोरात यांनी अकुजनगर ते वारणाली जाणाऱ्या रस्त्यावरील हद्दपार असलेला गुन्हेगार किरण लोखंडे, अभिजित राणे, तुषार माने हे पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर ६ पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे मिळाली. पिस्तुले कोठून आणली याची चौकशी केल्यानंतर त्यांनी मे २०२५ मध्ये मध्यप्रदेशातील उमराटी, पोस्ट बलवाडी येथे जाऊन पाजी नामक व्यक्तीकडून ६ पिस्तुले खरेदी केल्याची कबुली दिली. तिघांना ताब्यात घेऊन पिस्तुले, काडतुसे, असा ३ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा शस्त्रसाठा आणि दुचाकी, असा ४ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस कर्मचारी ऋषिकेश सदामते यांनी याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमानुसार फिर्याद दिली आहे.
या कारवाईत कर्मचारी संदीप पाटील, अतुल माने, अरुण पाटील, प्रकाश पाटील, संदीप गुरव, रणजित जाधव, उदयसिंह माळी, विनायक सुतार, रोहन घस्ते, अजय पाटील, अभिजित पाटील सहभागी झाले होते.
किरण लोखंडे हा खुनातील संशयित
कुपवाडमधील कामगार कंत्राटदार दत्तात्रय पाटोळे याच्या खुनातील पाच संशयितांचा सहभाग होता. किरण लोखंडे हा पाटोळे याच्या खुनातील संशयित आहे. त्याच्यावर सहा महिन्यांपूर्वी हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. हद्दपारीचा भंग केल्याबद्दलही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.