सांगली : महापारेषणच्या गुणवत्तायादीत हमखास नाव आणण्यासाठी ११ लाख ४० हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उमेदवार तरुणीचे वडील दिलावर हसन नदाफ (रा. पोळमळा, शंभर फुटी रस्ता, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिवाजी अर्जुन सलगर (रा. सनमडी, ता. जत) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.अधिक माहिती अशी, फिर्यादी दिलावर नदाफ हे एका संस्थेत लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मुलगी शाहीन हिने महापारेषणमधील जागेसाठी परीक्षा दिली होती. दिलावर आणि संशयित शिवाजी सलगर याची ओळख होती. त्याने दिलावर यांची मुलगी शाहीन हिचे महापारेषणच्या गुणवत्तायादीत नाव आणतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. महापारेषणच्या परीक्षेत शाहीन यांचे नाव गुणवत्तायादीत हमखास आणण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील, असे सांगितले.शिवाजी सलगर हा गुणवत्तायादीमध्ये शाहीनचे नाव आणेल असा विश्वास बसल्याने दिलावर यांच्यासह त्यांची मुलगी शाहीन आणि जावई यांनी संशयित शिवाजी सलगर याला वेळोवेळी ऑनलाइन आणि रोख स्वरूपात ११ लाख ४० हजार रुपये दिले. फसवणुकीचा प्रकार दि. १३ जानेवारी ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घडला.पैसे घेतल्यानंतर; परंतु गुणवत्तायादीत नाव न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे दिलावर यांना लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सलगर याच्याकडे पैसे परत मागितले. तेव्हा त्याने पैसे देण्यास नकार दिला. याप्रकरणी दिलावर यांनी आर्थिक गुन्हे शाखेत फसवणुकीची तक्रार दाखल केली. अर्जाची चौकशी होऊन सलगर याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Sangli: महापारेषणमध्ये निवडीसाठी ११ लाख ४० हजार घेतले, सनमडीतील तरुणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:08 IST