रत्नागिरीतील ज्वेलर्समध्ये चोरट्याचा डल्ला, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन सुरु केला शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:14 IST2026-03-30T13:13:23+5:302026-03-30T13:14:46+5:30
या प्रकारामुळे शहरातील व्यापारी धास्तावले

रत्नागिरीतील ज्वेलर्समध्ये चोरट्याचा डल्ला, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन सुरु केला शोध
रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथील सुमित्रा ज्वेलर्सचे शटर ताेडून चोरट्याने डल्ला मारल्याचे आज सकाळी उघडकीला आले. चाेरट्यांनी ज्वेलर्समधून चांदी चाेरीला नेल्याचे समाेर आले असून, ही चाेरी पहाटे झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकारामुळे शहरातील व्यापारी धास्तावले आहेत.
चाेरीची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल हाेऊन पंचनामा केला. पाेलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज हाती घेतले असून, त्याद्वारे चाेरट्यांचा शाेध घेतला जात आहे. प्रभारी शहर पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, सहायक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे आणि अंमलदारांनी या परिसरात काही धागेदाेरे हाती लागतात का, याचा शाेध घेतला.
शहरात चाेरट्यांनी पुन्हा डाेके वर काढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चाेरट्यांचा शाेध घेण्यास सुरुवात केली आहे. दुकानातील सीसीटीव्हीही पाेलिसांकडून तपासण्यात येत आहेत.