Ratnagiri: महामार्ग चौपदरीकरणातील चुकांमुळे अपघात वाढले, खेड तालुक्यात नवे ब्लॅक स्पॉट तयार झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 18:13 IST2025-05-20T18:13:28+5:302025-05-20T18:13:49+5:30
उपाययोजनाच नाहीत

Ratnagiri: महामार्ग चौपदरीकरणातील चुकांमुळे अपघात वाढले, खेड तालुक्यात नवे ब्लॅक स्पॉट तयार झाले
खेड : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होताना अवघड आणि धोकादायक वळणे काढून टाकली जाणे अपेक्षित होते. मात्र ती तशीच राहून आणखीही काही नवे ब्लॅक स्पॉट तयार झाले आहेत. दुर्दैवाने यामध्ये खेड तालुक्यातील भाेस्ते घाट आणि जगबुडी नदीवरील पूल अशा दोन ठिकाणांचा समावेश आहे. भोस्ते घाटात गेल्या वर्ष / दीड वर्षात १०० हून अधिक अपघात झाले आहेत तर जगबुडी नदीवरून पुलावर आतापर्यंत सातपेक्षा अधिक मोठे अपघात झाले आहेत.
खवटी ते धामणदेवी या सुमारे ४४ कि.मी.च्या चौपदरीकरणात अनेक ठिकाणी महामार्गाचे निकष न पाळताच केवळ रुंदीकरण करण्यात आले आहे. या ४४ कि.मी. च्या टप्प्यात केवळ ३ उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. यातील एक पूल भरणे नाका येथे असून या पुलाचे टोक या जगबुडी पुलावर येऊन मिळते याच ठिकाणी उड्डाणपुलाचा सर्व्हिस रोडही येऊन मिळतो.
या अरुंद भागात वळण असल्यामुळे मुंबईकडून उड्डाण पुलावरून वेगाने येणारी वाहने अनियंत्रित होऊन सातत्याने अपघात घडत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. यापूर्वी टँकर, ट्रक ट्रेलर यासारख्या अवजड वाहनांचे अपघात झाले आहेत. एका अपघातात ट्रक चालक समोरील काचेतून नदीत पडला होता. पुलाच्या उजव्या बाजूला असलेली संरक्षक भिंत तुटली असून, त्यामुळेच सोमवारी पहाटे कार थेट नदीपात्रात कोसळली असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले.
उपाययोजनाच नाहीत
- महामार्गाचा आराखडा तयार करताना यामध्ये गंभीर दोष असल्याचे भोस्ते घाटातही सिद्ध झाले आहे.
- तीव्र उतार व वळण असलेल्या ठिकाणी गेल्या काही वर्षांच्या कालावधीत शेकडो किरकोळ व गंभीर अपघात झाले आहे.
- या वळणावर मोठे कंटेनर व ट्रेलर, ट्रक, खासगी आरामबसचे अपघात वारंवार झाले आहेत.
- मात्र या गंभीर विषयावर ठेकेदार कंपनी किंवा महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंते यापैकी कोणीही ठोस उपाययोजना करण्याच्या विचारातच नाहीत.
दोन पूल एकत्र येतात तेथे..
- महामार्ग चौपदरीकरणाच्या आराखड्यात हे दोन्ही नवीन पूल बांधताना वाहनांचा वेग लक्षात घेऊन त्या पुलांचे जोडरस्ते शास्त्रीय परिमाणात बांधणे आवश्यक होते. मात्र याकडे त्यावेळी पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
- मात्र किमान याठिकाणी सातत्याने होत असलेले अपघात लक्षात घेऊन महामार्ग बांधकाम विभागाने ठेकेदार कंपनीला अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करून घेण्यात भाग पाडणे गरजेचे होते. त्याकडे लक्ष न दिल्याने आतापर्यंत अनेक अपघात झालेत आणि बळीही गेले आहेत.
१०० हून अधिक अपघात भोस्ते घाटात गेल्या वर्ष / दीड वर्षात झाले आहेत तर जगबुडी नदीवरून पुलावर आतापर्यंत सातपेक्षा अधिक मोठे अपघात झाले आहेत