Ratnagiri: ..अन् चिपळुणातील निवृत्त शिक्षिकेच्या खूनाचा झाला उलगडा; जयेश गोंधळेकरचा दुसरा साथीदार साताऱ्याचा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:46 IST2025-08-11T13:44:49+5:302025-08-11T13:46:36+5:30
पाच दिवसांची पोलिस कोठडी

Ratnagiri: ..अन् चिपळुणातील निवृत्त शिक्षिकेच्या खूनाचा झाला उलगडा; जयेश गोंधळेकरचा दुसरा साथीदार साताऱ्याचा?
चिपळूण : येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या खूनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित जयेश गोंधळेकर याला न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असलेला त्याचा साथीदार हा साताऱ्यातील असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक स्वतंत्र पथक तयार केले आहे.
गोंधळे येथील जिल्हा परिषद शाळेतून निवृत्त झालेल्या वर्षा जोशी यांच्या खुनानंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. हा नियोजनपूर्वक केलेला खून असल्याचा संशय पोलिसांना येताच त्या दिशेने तपास करण्यात आला. तब्बल १२ हून अधिक लोकांची चौकशी या प्रकरणात पोलिसांनी केली होती तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासले होते. त्या माध्यमातून काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते.
जयेश गोंधळेकर याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली तसेच पैसे व दागिन्यांसाठी आपण हे कृत्य केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. पाेलिसांनी त्याच्याकडून काही मुद्देमालही हस्तगत केला आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी एकाचा समावेश असल्याचे पुढे आले असून, त्यादृष्टीने पाेलिस तपास करत आहेत. संशयित जयेश याचा अन्य साथीदार साताऱ्याचा असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यादृष्टीने पाेलिस तपास करत आहेत.
ट्रॅव्हल्स बुकिंगचा धागा अन् उलगडा
वर्षा जोशी या सतत सहल व ट्रिपच्या माध्यमातून पर्यटन करत होत्या. त्यामुळे ट्रॅव्हल्स बुकिंग हा धागा पकडत पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आणि जयेश गोंधळेकर या ट्रॅव्हल्स एजंटचे नाव पुढे आले. पोलिसांनी थेट चौकशीला सुरुवात केली व अखेर वर्षा जोशी यांच्या खुनाला वाचा फुटली.