प्रेयसीचा खून करणाऱ्या दुर्वास पाटीलने दोन खून केल्याची पुढे आली माहिती, मदत करणाऱ्या इस्लामपूरच्या एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:21 IST2025-09-02T12:20:28+5:302025-09-02T12:21:36+5:30
अटकेतील आरोपींची संख्या चार

प्रेयसीचा खून करणाऱ्या दुर्वास पाटीलने दोन खून केल्याची पुढे आली माहिती, मदत करणाऱ्या इस्लामपूरच्या एकास अटक
रत्नागिरी : लग्नात बाधा नको, म्हणून वायरने गळा आवळून प्रेयसी भक्ती मयेकर हिचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दुर्वास दर्शन पाटील याने गतवर्षी दोन खून केले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दोघेही दुर्वास पाटील याच्या बारमध्ये कामाला होते. भक्तीच्या खुनाचा तपास करताना ही माहिती पुढे आली आहे. गतवर्षीच्या दोन्ही खूनप्रकरणी जयगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश जंगम (वय २८) आणि सीताराम वीर (५०) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. दोघेही सायली बारमध्ये कामगार होते. या दोन खून प्रकरणातील दुर्वासचा साथीदार नीलेश रमेश भिंगार्डे (वय ३५, रा. इस्लामपूर, जि.सांगली) याला सोमवारी अटक करण्यात आली. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे.
राकेश अशोक जंगम (वय २८) रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील रहिवासी होता. ६ जून २०२४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास तो कपड्यांची बॅग घेऊन घरातून बाहेर पडला. बराच काळ होऊनही तो परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचा पत्ता न लागल्याने २१ जून २०२४ रोजी त्याची आई वंदना अशोक जंगम (वय ५६) यांनी पोलिसांत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
भक्तीच्या खुनाची चौकशी सुरू असताना दुर्वास पाटील याने पोलिसांसमोर राकेश जंगम याचाही खून केल्याची कबुली दिली. दुर्वासने पोलिसांना सांगितले, कोल्हापूरला जायचे आहे असे सांगून राकेशला गाडीत सोबत घेतले. खंडाळा ते कोल्हापूर प्रवासादरम्यानच राकेशचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून दिला.
यामध्ये आपल्याला विश्वास विजय पवार (वय ४१, रा. कळझोंडी) व नीलेश रमेश भिंगार्डे (वय ३५, रा. इस्लामपूर, जि.सांगली) यांनी मदत केली आहे. भक्तीच्या खून प्रकरणात दुर्वास आणि विश्वास पवार आधीच अटकेत आहेत. आता पोलिसांनी नीलेश भिंगार्डे यालाही अटक केली आहे.
राकेशच्याही आधी एक खून
राकेश जंगम याच्या खुनाच्या आधी सीताराम वीर या कामगाराचा खून झाला असल्याचे तपासात पुढे आले. एका वादामुळे २०२४ मध्येच दुर्वासने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन वीर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणीही जयगड पोलिस स्थानकात दुर्वास आणि त्याच्या दोन साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारमधील फुटेज ताब्यात
सोमवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी खंडाळा येथे भेट दिली आणि दुर्वास पाटील याच्या सायली बारमधील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. त्यातून काही धागेदोरे हाती लागतात का, याची माहिती घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.