चिपळुणातील विद्यार्थिनीचा स्कूल व्हॅनचालकाकडून विनयभंग, संतप्त पालकांनी दिला चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 12:51 IST2025-10-17T12:50:46+5:302025-10-17T12:51:38+5:30
पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

चिपळुणातील विद्यार्थिनीचा स्कूल व्हॅनचालकाकडून विनयभंग, संतप्त पालकांनी दिला चोप
चिपळूण : लोटे येथील महाराजावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच चिपळुणातही एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने याबाबतची तक्रार चिपळूण पोलिस स्थानकात दिली असून, पोलिसांनी स्कूल वाहनचालकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
वहाब खालिद वावेकर (२८) असे या वाहनचालकाचे नाव आहे. चिपळूण परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनी त्याच्या वाहनाने प्रवास करतात. बुधवारी वहाब याने आपल्या वाहनातून प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची गंभीर घटना घडली. पीडित विद्यार्थिनीने ही हकीकत आपल्या पालकांना सांगितल्यानंतर संतापलेल्या पालकांनी व नागरिकांनी याबाबतचा जाब विचारत वहाब याला यथेच्छ प्रसादही दिला.
त्यानंतर सायंकाळी त्याच्याविरोधात चिपळूण पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली आणि वाहनचालकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्या वाहनचालकावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या घटनेचे वृत्त गुरुवारी चिपळूण शहरात पसरले आणि नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. संबंधित वाहनचालकाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.