जिल्हा परिषद सभापती निवडीत रत्नागिरीला झुकते माप; भाजपची पाटी कोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:13 IST2026-03-26T16:12:15+5:302026-03-26T16:13:00+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर बुधवारी विषय समित्यांच्या सभापती पदांची निवडही अपेक्षेप्रमाणे बिनविराेध झाली. यामध्ये महिला ...

जिल्हा परिषद सभापती निवडीत रत्नागिरीला झुकते माप; भाजपची पाटी कोरी
रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर बुधवारी विषय समित्यांच्या सभापती पदांची निवडही अपेक्षेप्रमाणे बिनविराेध झाली. यामध्ये महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी मयुरी शिर्के, समाजकल्याण समिती सभापतिपदी ॲड. सुयोग कांबळे, शिक्षण व अर्थ सभापतिपदी नंदकुमार मुरकर आणि कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतिपदी महेश नाटेकर याची निवड झाली. चारपैकी दोन सभापतिपदे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाला मिळाली आहेत. दोन महत्त्वाच्या लढतींमध्ये विजय मिळवणाऱ्या शिंदेसेनेच्या शिलेदारांना सभापतिपदाचे बक्षीस मिळाले आहे.
महिला व बालकल्याण सभापती शिर्के या चिपळूण तालुक्यातील कळवंडे गटातून, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती नाटेकर गुहागर तालुक्यातील पडवे गटातून, शिक्षण व अर्थ समिती सभापती नंदकुमार मुरकर हे रत्नागिरी तालुक्यातील गोळप गटातून आणि ॲड. कांबळे हे रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गटातून निवडून आले आहेत.
या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी काम पाहिले. या निवडीच्या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव हे उपस्थित होते.
सभापतिपदाच्या निवडीनंतर शिंदेसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. सर्व नूतन सभापतींना त्यांच्या दालनात सन्मानपूर्वी विराजमान करताना माजी आमदार संजय कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक, माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, संजय साळवी, जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, महेश म्हाप, अण्णा कदम, नेताजी पाटील, गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरीला दोन सभापतिपदे
जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे नूतन सभापती नंदकुमार मुरकर यांनी पाच वेळा निवडून आलेले सदस्य असून, माजी उपाध्यक्ष उदय बने यांचा त्यांनी मोठ्या फरकाने पराभव केला आहे. हातखंबा गटात उभे असलेले समाजकल्याण समितीचे माजी सभापती पर्शुराम कदम यांचा ॲड. सुयोग कांबळे यांनी पराभव केला. त्यांना समाजकल्याण सभापतिपद देण्यात आले. या दोन्ही निवडणुका शिंदेसेनेसाठी महत्त्वाच्या होत्या. त्यात मिळवलेल्या विजयामुळे या दोघांना सभापतिपदाचे बक्षीस मिळाले आहे.
नाटेकर दुसऱ्यांदा सभापती
महेश नाटेकर यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषविले होते. त्यावेळी त्यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतिपदाची जबाबदारी हाती. आता त्यांच्याकडे पुन्हा कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतिपद देण्यात आले आहे.