चिपळूणमध्ये सरकारी नोकरीच्या आमिषाने एकास २४ लाखांचा गंडा, रायगडातील एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:32 IST2026-01-09T13:32:31+5:302026-01-09T13:32:50+5:30
चिपळूण : ‘सरकारी नोकरी लावतो,’ असे आमिष दाखवून तब्बल आठ जणांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार खेर्डी (ता. चिपळूण) ...

चिपळूणमध्ये सरकारी नोकरीच्या आमिषाने एकास २४ लाखांचा गंडा, रायगडातील एकावर गुन्हा दाखल
चिपळूण : ‘सरकारी नोकरी लावतो,’ असे आमिष दाखवून तब्बल आठ जणांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार खेर्डी (ता. चिपळूण) परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात महेश भास्कर म्हात्रे (रा. जिते, पेण, जि. रायगड) येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने डिसेंबर २०२२ ते मे २०२४ या कालावधीत २४ लाख २५ हजारांचा गंडा घातल्याचे समाेर आले आहे.
या फसवणूकप्रकरणी नितीन श्रीकांत रसाळ (वय ४०, रा. बुरंबाड, वरचा वठार, शेवरवाडी, ता. संगमेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा शेतीचा व्यवसाय असून, महेश म्हात्रे याने स्वत:ची ओळख प्रभावशाली व्यक्ती म्हणून करून देत ‘सरकारी खात्यात नोकरी लावून देतो,’ असे नितीन रसाळ यांना सांगितले. या आमिषाने रसाळ यांच्याकडून आरोपीने ६ लाख रुपये घेतले. इतकेच नाही, तर त्याने अन्य सात जणांनाही नाेकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एकूण १८ लाख २५ हजार रुपये घेतले.
मात्र, कोणालाही सरकारी नोकरी लावली नाही. तसेच घेतलेली २४ लाख २५ हजारांची रक्कमही त्याने परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नितीन रसाळ यांनी चिपळूण पाेलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार ७ जानेवारी २०२६ राेजी महेश म्हात्रे याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ४२०, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
बँकांचीही फसवणूक
महेश म्हात्रे याने जनता सहकारी बँक, शाखा चिपळूण व एचडीएफसी बँक, शाखा चिपळूण येथून कर्ज घेतले आहे. या कर्जाच्या आधारे त्याने चारचाकी, दुचाकी तसेच दोन मोबाइल फोन खरेदी केले आहेत. मात्र, त्याने या कर्जाचे हप्ते मे २०२४पासून भरलेले नसल्याचे पुढे आले आहे. तब्बल १६ लाख ६० हजार ५८४ रुपयांची कर्ज रक्कम थकीत असून, बँकांचीही आर्थिक फसवणूक केल्याचे पुढे आले आहे.
फोन केल्यास धमकी
नितीन रसाळ यांनी आपण दिलेले पैसे परत मागितले असता आरोपीने फोनवरून शिवीगाळ करत ‘तुझी वाट लावीन, तुझी बदनामी करीन’, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
तब्बल ४०.८५ लाखांची फसवणूक
महेश म्हात्रे याने नाेकरीच्या आमिषाने २४ लाख २५ हजारांची फसवणूक केली आहे. तसेच बँकांची १६ लाख ६० हजार ५८४ रुपये अशी एकूण ४० लाख ८५ हजार ५८४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.