एकच जिद्द..रिफायनरी रद्द; रिफायनरी विरोधात राजापूर तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 01:24 PM2022-03-30T13:24:24+5:302022-03-30T13:36:46+5:30

आजच रिफायनरी प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांमध्ये शिवसेनेच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.

One persistence..refinery cancellation; Massive protest against refinery at Rajapur tehsil office | एकच जिद्द..रिफायनरी रद्द; रिफायनरी विरोधात राजापूर तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा

एकच जिद्द..रिफायनरी रद्द; रिफायनरी विरोधात राजापूर तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा

Next

राजापूर : एकच जिद्द .. रिफायनरी रद्द यासह शिवसेनेचे मंत्री, आमदार यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत आज बुधवारी रिफायनरी विरोधकांनी राजापूर तहसील कार्यालयावर केंद्र शासनाच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात मोर्चा काढून आपला विरोध दर्शवला. तर, धोपेश्वर बारसु परिसरात शिवसेनाच या प्रकल्पासाठी आग्रही असल्यामुळे या मोर्चात शिवसेनाविरोधी घोषणाच अधिक देण्यात आल्या.

दरम्यान, आजच रिफायनरी प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांमध्ये शिवसेनेच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.

केंद्र सरकारच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला या अगोदर नाणार परिसरात विरोध करण्यात आला होता. त्यावेळी काही एनजीओंच्या माध्यामातून येथील स्थानिकांच्या मनात या रिफायनरी प्रकल्पाबाबत गैरसमज पसरवण्यात आले होते. यात शिवसेनेनेही उडी घेत प्रकल्पाला विरोध करत युतीच्या शासनाला प्रकल्पाची जमीन अधिग्रहणाची अधिसुचना रद्द करण्यास भाग पाडले होते . २०१९ च्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर युतीसाठी भाजपाने ही अधिसुचना रद्द केली होती. त्यानंतर रिफायनरी प्रकल्पाचा प्रश्न काही अंशी थांबला होता .
 
मात्र दरम्यानच्या काळात नाणार परिसरातील स्थानिक प्रकल्प समर्थक शेतकऱ्यांनी सुमारे साडेआठ हजार एकर जमीन या रिफायनरी प्रकल्पासाठी देण्याची तयारी असल्याचे संमतीपत्रे शासनाकडे सादर केली होती. तरीही विरोधात उतरलेल्या शिवसेनेने रिफायनरी विरोधाचा हेका कायम ठेवत नाणार जाणार म्हणजे जाणार अशी घोषणा दिली होती. त्यानंतर या प्रकल्पाचे भवितव्य अंधारमय झाले होते.

दरम्यानच्या काळात शिवसेनेने धोपेश्वर बारसु परिसरात मिनी औद्योगिक वसाहतीसाठी अधिसुचना जाहीर केली होती. त्यानंतर या परिसरात रिफायनरी प्रकल्प हलवण्याची तयारी सुरु केली. या धोपेश्वर बारसु परिसरातील जनतेने या प्रकल्पाला पाठिंबा देत समर्थन केले व तशी मागणी शासनाकडे एकमुखाने केली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी रिफायनरी होण्याचे संकेत दिले. गेले दोन दिवस कोकण दौऱ्यावर असणारे आदित्य ठाकरे यानी मंगळवारी पुन्हा राजापूर येथे या प्रकल्पाचे सुतोवाच केले. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधाचा सूर आळवण्यात आला आहे.

Web Title: One persistence..refinery cancellation; Massive protest against refinery at Rajapur tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.