Ratnagiri Politics: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव भाजपमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:58 IST2025-08-21T18:58:31+5:302025-08-21T18:58:58+5:30
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Ratnagiri Politics: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव भाजपमध्ये
चिपळूण : वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, उद्योजक प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे, माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात झाला.
काही दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट देत आयोजित पत्रकार परिषदेत प्रशांत यादव भाजपात प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली. मंगळवारी प्रशांत यादव शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांसमवेत भर पावसात चिपळूणहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात पोहोचल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांचे भाजपात स्वागत केले.
यानंतर शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष बळीराम मोरे, राष्ट्रवादीचे माजी युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विजय देसाई, माजी उपसभापती अनंत हरेकर, अनिल चव्हाण, मुग्धा जागुष्टे, माजी सभापती सुभाष नलावडे, माजी पंचायत समितीच्या सदस्य दीप्ती महाडिक, सुनील तटकरे, रघुनाथ ठसाळे, युवा विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, पाचाडचे माजी सरपंच अनिल चिले, अल्पसंख्यक सेलचे अन्वर जबले, पिंपळीचे माजी सरपंच सुनील देवरुखकर, शशिकांत साळवी, जनार्दन पवार, अर्बन बँकेचे संचालक निलेश भुरण यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, उद्योजक, डॉक्टर, वकील १७ सरपंच, विविध सेलचे पदाधिकारी, २४ ग्रामपंचायत सदस्य अशा हजारो प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.
यावेळी भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, सरचिटणीस विनोद भोबस्कर, माजी नगरसेविका रसिका देवळेकर, माजी नगरसेवक विजय चितळे, माजी शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, अमोल भोबस्कर आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.